Join us

चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:17 IST

Gold Rate : गेल्या पाच वर्षांत सोन्याचे मार्केट कॅप दुप्पट झाले आहे. या वर्षात सोन्याचा दर 33 टक्क्यांनी वधारला आहे...

सोन्याचा भाव रोजच्या रोज नवनवे विक्रम बनवताना दिसत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2,750 डॉलर प्रति औंस पार गेला आणि सोन्याचे मार्केट कॅप 18.4 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले, जे चीनच्या अर्थव्यवस्थे बरोबरीचे आहे. अमेरिकेनंतर चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या पाच वर्षांत सोन्याचे मार्केट कॅप दुप्पट झाले आहे. या वर्षात सोन्याचा दर 33 टक्क्यांनी वधारला आहे. अमेरिकेचे मार्केट कॅप 57 ट्रिलियन डॉलर एवढे आहे तर बिटकॉइनचे मार्केट कॅप 1.4 ट्रिलियन डॉलर एवढे आहे.

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चुरस, यांमुळे सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असून. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात जबरदस्त फाइट होताना दिसत आहे. कुणालाही स्पष्ट विजय मिळताना दिसत नाही. यामुळे सोन्याला झळाळी येत आहे. खरे तर, जेव्हा-जेव्हा जगात एखादी आपत्ती येते अथवा अनिश्चिततेची स्थिती निर्माण होते, तेव्हा तेव्हा सोने चमकते. याचे कारण म्हणजे, सोने हे गुंतवणुकीचे सर्वात सुरक्षित माध्यम मानले जाते. यावेळीही गुंतवणूकदार गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायाकडे वळत आहेत.

भारतात सोन्याचा दर - दरम्यान, राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 750 रुपयांनी वाढून 80,650 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याचवेळी चांदीच्या किमतीनेही पाच हजार रुपयांची जबरदस्त उसळी घेत सार्वकालिक उच्चांक गाठला. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स बँक ऑफ चायनाने व्याजदरात कपात केल्याने सोन्याचे भाव वधारले आहेत. चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशीही वाढ दिसून आली आणि हा दर 5,000 रुपयांनी वधारून 99,500 रुपये प्रति किलो या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

टॅग्स :सोनंबाजारचीनअमेरिका