Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोने महागले, चांदीच्या भावातही वाढ, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 15:29 IST

दीड हजार रुपये प्रतिकिलोने घसरण झालेल्या चांदीच्या भावात पुन्हा ५०० रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊन - ४ नंतर अनलॉक -१मधील दुस-या टप्प्यात सुवर्णबाजार सुरू झाल्यानंतर दुस-याच दिवशी दीड हजार रुपये प्रतिकिलोने घसरण झालेल्या चांदीच्या भावात पुन्हा ५०० रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी ४९ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. यासोबतच ८०० रुपये प्रति तोळ्याने घसरण झालेल्या सोन्याच्या भावातही पुन्हा ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ८०० रुपयांवर पोहोचले.लॉकडाऊनमुळे बंद असलेला सुवर्णबाजार ५ जून रोजी सुरू झाला. लॉकडाऊन ते अनलॉक या अडीच महिन्यांच्या कालावधीत चांदीचे भाव ११ हजार रुपये प्रतिकिलोने वाढून ते ३९ हजार रुपयांवरून ५० हजार रुपयांवर पोहोचले होते. विदेशातून आवक नसल्याने व सुवर्णबाजारही बंद असल्याने बाजारपेठेत मोड येत नव्हती. त्यामुळे सोने-चांदीची चणचण निर्माण होऊन त्यांचे भाव वाढले. लॉकडाऊननंतर सुवर्णबाजार उघडताच चांदीला चांगलीच चकाकी आली व ती थेट ५० हजारांवर पोहोचली. सोन्याचेही भाव अशाच प्रकारे वाढून ते ४७ हजार ३०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ६ जून रोजी ५० हजारांवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात दीड हजारांनी घसरण झाली व चांदी ४८ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली होती. अशाच प्रकारे ५ जून रोजी ४७ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ८०० रुपयांनी घसरण होऊन ते ४६ हजार ५०० रुपयांवर आले होते. त्यानंतर रविवारी बंद असलेला सुवर्ण बाजार सोमवार, ८ रोजी उघडताच चांदीच्या भावात ५०० रुपये प्रतिकिलोने वाढ होऊन ती ४९ हजार रुपयांवर पोहोचली. दुसऱ्या दिवशी मंगळवार, ९ रोजीदेखील याच भावावर चांदी स्थिर राहिली. अशाच प्रकारे सोन्याच्या भावातही सोमवारी २०० व मंगळवारी आणखी १०० रुपयांनी वाढ होऊन ते ४६ हजार ८०० रुपयांवर पोहोचले. दोन दिवसात सोन्यात ३०० रुपये प्रतितोळ्याने वाढ झाली. 

सोने खरेदीला चांगला प्रतिसादगेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेला सुवर्ण बाजार सुरू झाल्यानंतर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. लॉकडाऊनदरम्यान गुढीपाडवा, अक्षयतृतीया, गुरुपुष्यामृत अशा मुहूर्तावरील खरेदी होऊ शकली नव्हती. आता बाजार सुरू झाल्याने उत्साह दिसून येत आहे. 

टॅग्स :सोनं