जळगाव : मल्टि कमॉडिटी बाजारात सोने-चांदीत मोठी उलाढाल सुरूच असून अमेरिकन डॉलरचे वधारलेले दर व अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीकडे वाढत असलेला कल यामुळे सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. चार दिवसात सोन्याच्या भावात तोळ्यामागे ११०० रुपयांची वाढ होऊन दर ४६, ७०० रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीमध्ये मात्र घसरण होऊन दर ४२, १०० रुपये प्रती किलोवर आले आहेत.कोरोनामुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेत अनिश्चितता निर्माण झाल्याने सोन्यामधील गुंतवणूक वाढत आहे. दुकाने बंद असली तरी कमॉडिटी बाजारात सौदे सुरू आहेत. २४ एप्रिल रोजी डॉलरचा दर ७६.३४ रुपयांवर पोहोचल्याने सोन्याच्या भावात वाढ झाली. यासोबतच दोन दिवसांवर आलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोन्यात गुंतवणूक वाढण्याची शक्यता असल्याने कमॉडिटी बाजारात दलालांकडून सोने खरेदी करण्यावर भर दिला जात आहे.सुवर्ण पेढ्या बंद असल्यातरी या दिवशी अनेक जण गुंतवणूक करण्याची शक्यता असल्याने या दिवशी आता खरेदी करून ठेवलेले सोने विक्रीला काढून सौदे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच सोन्याचे भाव वधारत असल्याचे जाणकारांनी सांगितले.कमॉडिटी बाजारात आठवडाभरात सोन्याचे भाव ४४, ६०० रुपयांवर पोहचले. १९ एप्रिल रोजी ४६ हजार ७०० रुपयांवर पोहचले. आता २४ एप्रिल रोजी दर ४६,७०० रुपये प्रती तोळा झाले आहेत. खरेदीचा कल पाहता कमॉडिटी बाजारात सोने ४७ हजार रुपयांवर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.चांदीच्या दरामध्ये मात्र घसरणसोन्याच्या दरामध्ये वाढ होत असताना चांदीत मात्र घसरण होत आहे. ८ एप्रिल रोजी ४६ हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी आता ४२, १०० रुपये प्रति किलोवर आली आहे.
सोन्याचे दर ४७ हजारांच्या दिशेने
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 03:10 IST