Join us

सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 07:13 IST

Gold Price: एप्रिल २०२४ मधील सोन्याच्या दरात ३०.४० टक्क्यांनी वाढ होऊन २०२५च्या एप्रिलमध्ये किमतीने एक लाखाचा टप्पा गाठून विक्रम केला आहे. याआधी २०११ मध्येही अशीच ३१.१० टक्क्यांनी वृद्धी झाली होती. 

- विनायक कुळकर्णी  आर्थिक समुपदेशक 

मागील पंचवीस वर्षांचा सोन्याच्या दरातील वाढीचा आढावा घेतला असता, २००० सालच्या डिसेंबरपासून ते २०१०च्या ऑक्टोबरपर्यंत सोन्याच्या किंमतीमध्ये तब्बल ३९४ टक्के वाढ झाली होती.  २०१० साली २२ वेळा भाववाढ होऊन त्याने किमतींचे सर्व विक्रम मोडले होते. आताही एप्रिल २०२४ मधील सोन्याच्या दरात ३०.४० टक्क्यांनी वाढ होऊन २०२५च्या एप्रिलमध्ये किमतीने एक लाखाचा टप्पा गाठून विक्रम केला आहे. याआधी २०११ मध्येही अशीच ३१.१० टक्क्यांनी वृद्धी झाली होती. 

दीर्घ मुदतीत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदराबाबतचे धोरण आणि इतर देशांच्या केंद्रीय बँकांकडून वेळोवेळी  केली जाणारी सोनेखरेदी लक्षात घेता सोन्याच्या दरात भविष्यात सुद्धा वाढच अपेक्षित आहे.  ज्या-ज्या वेळी जगभरात कोविडसारखी महामारी किंवा युद्धजन्य किंवा कमालीची आर्थिक मंदीची परिस्थिती उद्भवते त्या-त्या वेळी सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होते. परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण निर्माण झाल्याने सोन्याच्या किमतीत वाढ होते. मध्यपूर्वेत भूराजकीय तणाव वाढत आहे. युक्रेन-रशिया युद्ध असो की इस्राईल -पॅलेस्टाइन युद्ध युरोप आणि मध्यपूर्वेत असणारी अशांतता, तसेच ऑपरेशन सिंदूर  लक्षात घेता बहुसंख्य देशांच्या केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी सुरू केली आहे. २०२३ मध्येच १०३७ टन सोने या बँकांनी खरेदी केले होते.    

अमेरिकेच्या ३६ ट्रिलियन डॉलर्स कर्जाचा भार बघून अमेरिकेच्या धोरणकर्त्यांना पण व्याजदर कपातीचे वेध लागलेले आहेत. ही कपात करण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून पावले टाकली आहेत. 

बहुसंख्य देश त्यांच्या वितरित केलेल्या चलनी कागदी नोटा किंवा अन्य धातूंची नाणी यांच्या सम प्रमाणात शुद्ध सोन्याचा साठा बाळगतात.    जागतिक घडामोडींचा विशेषत: आंतरराष्ट्रीय भूराजकीय अस्वस्थता आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात भाववाढ होत असताना भारतात नेमका लग्नाचा हंगाम आणि सण यामुळे मागणीत वाढ झाल्याने भारतात सुद्धा सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. 

याचा अर्थ सोन्याचे दर यापुढेही वाढत जाणार का? तर याचे उत्तर होय असे असले तरीही २०२६ मध्ये अमेरिका आणि युरोपातील काही देशांचा राखीव सोन्यातील काही हिस्सा विक्रीस येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने २०२६ मध्ये कदाचित प्रति ट्रोय औंस ३००० डॉलर्सपर्यंत सोन्याचा दर खाली उतरू शकतो. 

३१.१०३ ग्रॅम म्हणजे एक ट्रोय औंस असते. ८६ रुपये प्रति डॉलर दर गृहीत धरला तर भारतात सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम 

८२९५०  रुपये  इतका उतरू शकतो. परंतु त्यानंतर पुढील तीन ते चार वर्षांत सोन्याचा दर प्रति ट्रोय औंस 

४४००   डॉलर्स पर्यंत अपेक्षित आहे. जर युद्धजन्य किंवा खूपच जागतिक मंदी उद्भवली तर मात्र हाच दर ५००० डॉलर्स वर उंचावू शकतो. म्हणजेच भारतात प्रतिदहा ग्रॅम सोन्याचा दर 

१,४०,०००   ते दीड लाख रुपयांपर्यंत रुपया-डॉलरच्या विनिमय दरानुसार असण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :सोनं