Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Price Review: चांदीपेक्षा तिप्पट वेगानं वाढला सोन्याचा भाव, एका वर्षात सोनं ₹७५०१ नं महागलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 11:05 IST

या आर्थिक वर्षात सोन्याच्या किमतीत चांदीच्या तुलनेत तीन पटींनी वाढ झाली आहे. गुरूवारी 28 मार्च रोजी सराफा बाजारात सोन्याची किंमत 67252 रुपयांच्या आजवरच्या उच्चांकी स्तरावर बंद झाली.

Gold Price Review:  या आर्थिक वर्षात सोन्याच्या किमतीत चांदीच्या तुलनेत तीन पटींनी वाढ झाली आहे. गुरूवारी 28 मार्च रोजी सराफा बाजारात सोन्याची किंमत 67252 रुपयांच्या आजवरच्या उच्चांकी स्तरावर बंद झाली. एक वर्षापूर्वी 31 मार्च 2023 रोजी 24 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 59731 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. चांदीबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षभरात याच्या दरात 2545 रुपयांनी वाढ झाली आहे. 31 मार्च 2023 रोजी चांदीची किंमत प्रति किलो 71582 रुपये होती आणि गुरुवारी 28 मार्च 24 रोजी 72127 रुपयांवर बंद झाली. 

आयबीजेएनं जाहीर केलेल्या दरानुसार, गुरुवारी सोन्याचा भाव 984 रुपयांनी वाढून 67252 रुपयांच्या आजवरच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. याउलट चांदीचा भाव केवळ 75 रुपयांनी वाढून 72127 रुपयांवर बंद झाला. 

मार्चमध्ये विक्रमी तेजी 

मार्चमध्ये सोन्यानं एकामागून एक नवे इतिहास रचले. याची सुरुवात 5 मार्च रोजी झाली, जेव्हा 4 डिसेंबर 2023 रोजीचा 63805 रुपयांचा आजवरचा उच्चांकी स्तर सोन्यानं पार केला आणि 64598 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. अवघ्या दोन दिवसांनंतर, 7 मार्च रोजी, सोन्यानं 65049 वर पोहोचून इतिहास रचला. 11 मार्च रोजी सोन्याने 65646 चा नवा उच्चांकी स्तर गाठला. 10 दिवसांनंतर 21 तारखेला सोन्याचा भाव 66968 रुपयांवर पोहोचला आणि 28 मार्चला सर्व विक्रम मोडत तो 67252 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. 

का होतेय वाढ? 

"व्याजदरांबाबत सकारात्मक दृष्टीकोनादरम्यान सोन्याच्या किमती उच्चांकी स्तरावर होत्या, परंतु डॉलरच्या निर्देशांकात वाढ झाल्यानं त्यावर दबाव येऊ शकतो," अशी प्रतिक्रिया एलकेपी सिक्योरिटीजचे रिसर्च अॅनालिसिस विभागाचे उपाध्यक्ष जतिन त्रिवेदी यांनी दिली. चांदीच्या किंमतीत किरकोळ वाढ होऊन ती 24.55 डॉलर्स प्रति औंसवर व्यवहार करत होती. तर यापूर्वी चांदीची किंमत 24.50 डॉलर्स प्रति औंसवर बंद झाली होती. 

टॅग्स :सोनंव्यवसाय