Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या आयातीमध्ये मार्चमध्ये ४७१ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 04:46 IST

ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने नवीन उच्चांक नोंदविल्यानंतर आतापर्यंत १७ टक्क्याने दर कमी झाले आहेत. त्यामुळे देशामधील सोन्याची मागणी वाढत असून, त्यासाठी आयातीमध्ये वाढ केली जात आहे.

नवी दिल्ली : आयातीवर कमी झालेला कर आणि कमी झालेले सोन्याचे दर यामुळे मार्च महिन्यामध्ये सोन्याच्या आयातील ४७१ टक्क्यांची वाढ झाली आहे. या महिन्यामध्ये देशात १६० टन सोन्याची आयात झाली असून, यामुळे आयात-निर्यात व्यापारातील समतोल ढळण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने नवीन उच्चांक नोंदविल्यानंतर आतापर्यंत १७ टक्क्याने दर कमी झाले आहेत. त्यामुळे देशामधील सोन्याची मागणी वाढत असून, त्यासाठी आयातीमध्ये वाढ केली जात आहे. मार्च महिन्यामध्ये देशात १६० टन सोने आयात केले गेले. मागील वर्षाच्या याच महिन्याशी तुलना करता आयातीमधील वाढ ४७१ टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्यात आपल्याकडे लॉकडाऊन उशिराने लागले असले तरी जगामध्ये इतर ठिकाणी आधीपासूनच लॉकडाऊन सुरू असल्याने सोन्याची आयात घटली होती. मागील वर्षाच्या मार्च तिमाहीमध्ये १२४ टन सोन्याची आयात झाली होती. यंदा मात्र ही आयात ३२१ टनांवर आली आहे. अचानक वाढलेल्या या आयातीमुळे देशाच्या आयात -निर्यात व्यापारातील समतोलामध्ये बदल होत असून, आयात वाढल्याने या व्यापारातील तोटा वाढत आहे. याशिवाय रुपयावर मोठा ताण येत असल्याने डॉलरच्या तुलनेत त्याचे मूल्यही कमी होत असल्याचे समोर आले आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा उपभोक्ता देश आहे. सरकारने देशातील सोन्याची आयात कमी व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले असले तरी सोन्याचे आकर्षण कमी होत नाही.

टॅग्स :सोनं