Join us

नोकरी सोडू नका, पगारात 1 लाखांची वाढ करू! गो फर्स्टची वैमानिकांना ऑफर, कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 18:53 IST

फर्स्ट ऑफिसर्सच्या वेतनात दरमहा 50 हजारांनी वाढ करण्याची योजना आहे. सध्या या विमान कंपनीतील पायलटचे मासिक सरासरी पगार 5.3 लाख रुपये आहे.

नवी दिल्ली : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या लो-कॉस्ट विमान कंपनी गो फर्स्टला आणखी एका अडचणीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, कंपनीची अवस्था पाहता पायलट नोकरी सोडत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना रोखण्यासाठी कंपनीने पायलटच्या पगारात 1 लाख रुपयांची वाढ करण्याची ऑफर दिली आहे. तसेच, फर्स्ट ऑफिसर्सच्या वेतनात दरमहा 50 हजारांनी वाढ करण्याची योजना आहे. सध्या या विमान कंपनीतील पायलटचे मासिक सरासरी पगार 5.3 लाख रुपये आहे.

गो एअरलाइन्स इंडिया लिमिटेडची विमान कंपनी गो फर्स्टने दिवाळखोरी निवारण प्रक्रियेसाठी एनसीएलटीमध्ये 2 मे रोजी याचिका दाखल केली होती. गेल्या आठवड्यात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कंपनीकडून फ्लाइट ऑपरेशन्सबाबत सविस्तर अहवाल मागवला होता. सोमवारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या रिव्हाइवल योजनेबाबत डीजीसीएच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

आव्हानात्मक आणि गंभीर परिस्थितीत विमान सेवा प्रभावित होऊ नये, यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते. कारण, कंपनीसमोरील आर्थिक संकट पाहता गो फर्स्टचे पायलट इतर विमान कंपन्यांमध्ये नोकरीच्या शोधात असल्याचे वृत्त आहे. यानंतर गो एअरलाइन्स इंडिया लिमिटेडने आपल्या पायलटच्या पगारात 1,00,000 रुपये आणि फर्स्ट ऑफिसरच्या पगारात 50,000 रुपये दरमहा वाढ करण्याचा विचार करत आहे.

फायनान्शिअल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या अंतर्गत मेलमध्ये गो फर्स्टने म्हटले आहे की, वाढीव पगार 1 जूनपासून लागू होईल आणि 31 मे पर्यंत कंपनीचे कर्मचारी असलेले सर्व पायलट आणि फर्स्ट ऑफिसर सामील असतील. त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल, ज्यांनी राजीनामा दिला आहे. परंतु 15 जूनपर्यंत राजीनामा मागे घेण्यास तयार आहेत.

याचबरोबर, विमान कंपनीने सांगितले की, "आम्ही लवकरच कर्मचाऱ्यांसाठी लॉन्गेव्हिटी बोनसही जाहीर करू. जर गोष्टी सध्याच्या प्रगती योजनेनुसार गेल्यास, आम्हाला पुन्हा उड्डाण करण्यास वेळ लागणार नाही, ज्यामुळे आम्हाला नियमितपणे पगार देण्यासही मदत होईल." दरम्यान, सध्या गो फर्स्टने आपली सर्व उड्डाणे 30 मे पर्यंत पुढे ढकलली आहेत.

टॅग्स :विमान