Moody On Indian Economy : जागतिक रेटिंग एजन्सी 'मूडीज रेटिंग्ज' (Moody's Ratings) ने नुकतेच महासत्ता अमेरिकेची रेटिंग कमी केल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला होता. आपली पत कमी झाल्याने सरकारमधील मंत्र्यांनीही मूडीजवर टीकास्त्र सोडलं. याच 'मूडीज रेटिंग्ज' संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेवर मात्र विश्वास दाखवला आहे. मूडीजने आज (बुधवारी) आपल्या अंदाजात म्हटले आहे की, अमेरिकेने वाढवलेले शुल्क आणि जागतिक व्यापार आव्हाने असूनही, भारत या नकारात्मक परिणामांना चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी मजबूत स्थितीत आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेला कशाचा आधार?मूडीज रेटिंग्जने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, भारतातील खाजगी वापर वाढवण्यासाठी, उत्पादन क्षमता मजबूत करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांवर (रस्ते, पूल, वीज इ.) खर्च वाढवण्यासाठी सरकारने घेतलेले उपाय जागतिक मागणीतील कमकुवत परिस्थितीला तोंड देण्यास मदत करतील. याशिवाय, देशातील महागाई कमी झाल्यामुळे लवकरच व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी आधार मिळेल. बँकिंग क्षेत्रातही रोखीने कर्ज देण्याची सोय होईल, असे मूडीजने म्हटले आहे.
मूडीजने यावर जोर दिला की, "भारत अमेरिकेच्या कर आणि जागतिक व्यापार आव्हानांना तोंड देण्यासाठी इतर अनेक उदयोन्मुख बाजारपेठांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे, कारण त्याचे अंतर्गत वाढीचे घटक मजबूत आहेत, देशांतर्गत अर्थव्यवस्था मोठी आहे आणि वस्तूंच्या व्यापारावरील अवलंबित्व कमी आहे."
भारताचा विकासदर घटवला, पण चिंता नाहीया महिन्याच्या सुरुवातीला मूडीजने २०२५ कॅलेंडर वर्षासाठी भारताचा आर्थिक विकासदर ६.७ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्कात वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर एजन्सीने आपले अंदाज बदलले होते. (डोनाल्ड ट्रम्प यांनी २ मे रोजी आयात शुल्काची घोषणा केली होती. त्यानंतर, चीन वगळता जगातील सर्व देशांवरील शुल्क दर ९० दिवसांसाठी स्थगित करण्यात आले, तर त्यावर १० टक्के शुल्क कायम ठेवण्यात आले. मात्र, भारतीय स्टील आणि ॲल्युमिनियमवर उच्च कर दर लादण्यात आले होते.)
वाचा - चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाममूडीजने भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचाही आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम तपासला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जो तणाव दिसून आला, त्याचा पाकिस्तानच्या आर्थिक विकासावर मोठा आणि नकारात्मक परिणाम होईल, असे मूडीजने म्हटले आहे. मात्र, भारतात त्याचा परिणाम खूपच मर्यादित असेल. एजन्सीने म्हटले आहे की, जरी दोन्ही शेजारी देशांमधील तणाव कायम राहिला, तरी भारताच्या आर्थिक घडामोडींवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या दोन देशांमधील व्यापार खूपच कमी आहे.