Join us  

"...तर तरुणांचा उद्रेक होईल, आयातीपेक्षा निर्यातीला प्राधान्य धोकादायक"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 10:34 AM

सोशल मीडिया आणि फेक न्यूज यांचा वापर करून लक्ष विचलित करता येते, मात्र अखेरीस असे प्रयत्न अपयशी ठरतात, असे सूचक विधानही रघुराम राजन यांनी या वेळी केले.

मुंबई : मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आयातीवरील अवलंबित्व कमी करून निर्यातीला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. मात्र, हे धोकादायक असून त्यामुळे नवीन रोजगारनिर्मिती होणार नाही आणि पर्यायाने संतप्त तरुणांचा उद्रेक होईल, असा इशारा आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.

सोशल मीडिया आणि फेक न्यूज यांचा वापर करून लक्ष विचलित करता येते, मात्र अखेरीस असे प्रयत्न अपयशी ठरतात, असे सूचक विधानही रघुराम राजन यांनी या वेळी केले. बेरोजगार तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवता येईल पण ते फारच अल्प काळासाठी. जर त्यांना रोजगार मिळाला नाही तर ते अखेर रस्त्यावर उतरतील, असे राजन म्हणाले.

एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये राजन बोलत होते. आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत आयातीपेक्षा निर्यातीवर भर देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांबद्दलही राजन यांनी इशारा दिला. निर्यातीला प्राधान्य देण्याचे प्रयत्न यापूर्वीही देशात झाले असून ते आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत, याकडेही राजन यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

निर्यातीचे प्रमाण वाढवायचे असेल तर आयातही वाढली पाहिजे. देशातील निर्यातदारांना आपली निर्यात स्वस्त ठेवण्यासाठी आयात करण्याची गरज असते. चीनने इतर देशांतून विविध कच्च्या मालांची आयात केली आणि त्याचा वापर करून उत्पादित केलेल्या मालाची निर्यात केली. त्यामुळे चीन हा सर्वांत प्रबल निर्यातदार देश बनला, असे राजन यांनी सांगितले.

देशांतर्गत उत्पादनासाठी कमी शुल्क आकारून उत्पादननिर्मितीला पोषक वातावरण तयार केले पाहिजे, असे मतही राजन यांनी या वेळी व्यक्त केले. 

टॅग्स :रघुराम राजनअर्थव्यवस्थाभारतकेंद्र सरकार