Join us
Daily Top 2Weekly Top 5

२ वर्षांपूर्वी जगातील तिसरे मोठे श्रीमंत होते गौतम अदानी, आता टॉप २० मधून बाहेर जाण्याच्या स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 10:58 IST

देशातील बड्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे दोन वर्षांपूर्वी म्हणजेच १५ डिसेंबर २०२२ रोजी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु आता ते या यादीत खाली घसरलेत.

देशातील बड्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे दोन वर्षांपूर्वी म्हणजेच १५ डिसेंबर २०२२ रोजी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. फोर्ब्सनुसार, त्यांची संपत्ती १३३.२ अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती. त्यावेळी फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट हे जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. त्यांची संपत्ती १८४.३ अब्ज डॉलर होती, तर इलॉन मस्क १७४.८ अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ९१ अब्ज डॉलरसह या यादीत आठव्या क्रमांकावर होते. पण गेल्या दोन वर्षांत या यादीत मोठा बदल झालाय.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका अहवालानं अदानी समूहाला मोठा झटका बसला होता. अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनीनं अदानी समूहावर अनेक आरोप केले होते. यामध्ये शेअर्सच्या किमतीत छेडछाड केल्याच्या आरोपांचा समावेश होता. अदानी समूहानं हे आरोप फेटाळून लावले असले तरी यामुळे समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. याच कारणामुळे अदानी श्रीमंतांच्या यादीतही खाली गेले. गेल्या वर्षी १५ डिसेंबर रोजी अदानी यांचा जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत समावेश नव्हता.

५० अब्ज डॉलर्सची घसरण

नुकताच अमेरिकेत अदानी समूहाच्या कंपनीवर लाचखोरीचा आरोप करण्यात आला. यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. अदानी समूहानं हे आरोपही फेटाळून लावले होते. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अदानी सध्या १९ व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८२.१ अब्ज डॉलर्स आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत २.२१ अब्ज डॉलरची घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या संपत्तीत सुमारे ५० अब्ज डॉलरची घट झाली आहे.

टॅग्स :गौतम अदानीअदानी