Join us

मीडिया क्षेत्रात Adani चं वर्चस्व वाढलं, 'या' न्यूज एजन्सीमध्ये खरेदी केला अधिक हिस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 14:30 IST

उद्योजक गौतम अदानी समूहाचा मीडिया क्षेत्रातील दबदबा वाढत आहे.

उद्योजक गौतम अदानी समूहाचा (Adani Group) मीडिया क्षेत्रातील दबदबा वाढत आहे. अदानी समूहाने IANS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या वृत्तसंस्थेमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसनं सांगितलं की, त्यांची उपकंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेडनं IANS इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ५ कोटी रुपयांचे नवीन शेअर्स खरेदी केले आहेत.

एएमजी मीडिया नेटवर्क्सनं (AMG Media Networks) वोटिंग राईट्ससह IANS शेअर्सची मालकी ७६ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. अदानी एंटरप्रायझेसनं सांगितलं की, मतदान अधिकारांसह कॅटेगरी-१ मध्ये, एएमजी मीडिया नेटवर्कनं आपला हिस्सा ५०.५ टक्क्यांवरून ७६ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तर मतदान अधिकारांशिवाय कॅटेगरी -२ मध्ये, भागभांडवल ९९.२६ टक्क्यांपर्यंत वाढवलं ​​आहे. IANS च्या बोर्डाने १६ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत शेअर्स अलॉटमेंटला मान्यता दिली होती.

डिसेंबरमध्ये झालेली डील

डिसेंबर २०२३ मध्ये, अदानी समूहानं न्यूजवायर एजन्सी IANS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मधील ५०.५ टक्के स्टेक ५.१ लाखांमध्ये विकत घेतले होते. अदानी यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये मीडिया व्यवसायात प्रवेश केला होता. समूहाने क्विंटिलियन बिझनेस मीडियाच्या अधिग्रहणाची घोषणा केली. हे डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म बीक्यू प्राइमद्वारे ऑपरेट केलं जातं. यानंतर, डिसेंबरमध्ये ब्रॉडकास्टर एनडीटीव्हीमध्ये सुमारे ६५ टक्के हिस्सा विकत घेतला. आयएएनएसचा २०२२-२३ या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२२ ते मार्च २०२३) महसूल ११.८६ कोटी रुपये होता.

टॅग्स :गौतम अदानीअदानी