Join us

'मी 16 व्या वर्षी घर-शाळा सोडली, थेट मुंबई गाठले अन्...' गौतम अदानींना आठवले जुने दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 15:17 IST

Gautam Adani : जयपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना गौतम अदानी यांनी अमेरिकेच्या आरोपांसह धारावी प्रकल्पावरही भाष्य केले.

Gautam Adani : भारतीय उद्योगपती गौतम अदानी  (Gautam Adani) यांना जयपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांचे जुने दिवस आठवले. शनिवारी 51 व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना अदानी समूहाचे  (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी यांनी अमेरिकेतील कथित लाचखोरीच्या आरोपांपासून ते हिरे व्यवसायापासून सुरू झालेल्या आपल्या करिअरपर्यंत...विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

'मुंबईचे वन-वे तिकीट काढले...'गौतम अदानी म्हणाले, 'हिरे व्यवसाय हा माझ्या व्यवसायाच्या प्रवासाचा प्रवेशबिंदू होता. 1978 मध्ये मी अवघ्या 16व्या वर्षी शाळा सोडली, घर सोडले आणि वन वे तिकीट काढून थेट मुंबई गाठली. आता पुढे काय करायचे, कुठे जायचे, याची मला काहीच कल्पना नव्हती. पण, मला उद्योजक व्हायचे आहे, हे मी मनात घट्ट केले होते. मला विश्वास होता की, मुंबई संधींचे शहर आहे आणि उद्योजग होण्यासाठी मुंबईतूनच सुरुवात करावी लागेल.'

येथे पहिली संधी मिळाली'मुंबईत आल्यानंतर मला महेंद्र ब्रदर्समध्ये पहिली संधी मिळाली. तिथे मी हिरे वर्गीकरणाची कला आणि बारकावे शिकलो. आजही मला माझा पहिला करार केल्याचा आनंद आठवतो. तो जपानी खरेदीदारासोबतचा व्यवहार होता आणि मला त्यावेळी 10,000 रुपये कमिशन म्हणून मिळाले होते. हा तो दिवस होता, जेव्हा एक व्यावसायिक म्हणून माझ्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. व्यवसात सुरक्षा नसते, यात तुम्हाला योग्य संधी साधावी लागते, हे मला किशोरवयातच उमजले,' असंही अदानी म्हणाले.

अमेरिकेचे आरोप अन् मुंबई धारावी प्रकल्पावर मौन सोडलेगौतम अदानी यांनी यावेळी धारावी पुनर्विकास प्रकल्पावर भाष्य केले. ते म्हणाले की, 'माझ्यासाठी हा प्रकल्प केवळ झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रकल्प नाही, तर येथील 10 लाख रहिवाशांचे जीवन बदलण्याची संधी आहे.' आपल्या भाषणादरम्यान अमेरिकेतील आरोपांबाबत अदानी म्हणाले, 'आम्ही अशा प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अदानी समुहातील कोणाचेही नाव FCPA मध्ये आलेले नाही आणि न्यायात अडथळा आणल्याच्या आरोपाचा सामनाही केलेला नाही. असा प्रत्येक हल्ला आम्हाला आणखी मजबूत करतो, प्रत्येक अडथळा माझ्यासाठी एक संधी आहे,' अशी प्रतिक्रिया गौतम अदानी यांनी दिली.

टॅग्स :गौतम अदानीअदानीव्यवसायगुंतवणूक