Join us

गॅस सिलिंडर झाले स्वस्त; इलेक्ट्रिक वाहने महागली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 09:14 IST

१ जूनपासून दैनंदिन कामकाज आणि जीवनातील काही गोष्टींमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत.

१ जूनपासून दैनंदिन कामकाज आणि जीवनातील काही गोष्टींमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या किमती वाढल्या असून, व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ८३.५ रुपयांनी घटविली आहे. याशिवाय जूनमध्ये काही प्रमुख वित्तीय बदल झाले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया. 

विमान इंधन उतरले जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे विमान इंधन (एटीएफ) सात टक्के स्वस्त झाले आहे. दिल्लीत जेट इंधन ६,६३२.२५ रुपयांनी स्वस्त होऊन ८९,३०३.०९ रुपये प्रतिकिलोलिटर झाले आहे. विमान इंधनातील ही सलग चौथ्या महिन्यातील कपात ठरली आहे.

इलेक्ट्रिक गाड्या महागल्या : दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांवरील फेम-२ ची प्रतिकिलोवॅट सबसिडी सरकारने १५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये केली आहे. तसेच सबसिडीची कमाल मर्यादा ४० टक्क्यांवरून १५ टक्के केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी वाहने महागली आहेत.

बँका परत करणार लोकांचे पैसे बँकांतील बेवारस ठेवी (अनक्लेम्ड डिपॉझिट) त्यांचे मालक अथवा वारसांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिझर्व्ह बँक १ जूनपासून मोहीम राबविणार आहे. ‘१०० डेज १०० पेज’ नावाच्या या मोहिमेत १०० दिवसांत बेवारस ठेवींचे खातेदार किंवा वारसदार शोधून बँका ती रक्कम संबंधितांना परत करतील.

व्यावसायिक सिलिंडर ८३.५ रुपयांनी स्वस्त हॉटेल व रेस्टॉरंट्स यांच्या वापरातील १९ किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर ८३.५ रुपयांनी स्वस्त झाला. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १,८५६.५ रुपयांवरून १,७७३ रुपये झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झालेली आहे. 

टॅग्स :गॅस सिलेंडरइलेक्ट्रिक कार / स्कूटर