Galgotias University : राजधानी दिल्लीत सध्या AI परिषद सुरू आहे. एकीकडे ही परिषद वेगवेगळ्या आधुनिक भारतीय AI इनोव्हेशन्समुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे गलगोटिया युनिव्हर्सिटीमुळे याला गालबोटही लागले आहे. चीनी रोबो कुत्रा स्वतः तयार केल्याचा दावा करणाऱ्या गलगोटिया युनिव्हर्सिटीमुळे जागतिक स्तरावर भारताची नाच्चकी झाली आहे. अशा परिस्थितीत, हे विद्यापीठ नेमके कुठे आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पुस्तक दुकानातून सुरुवात...
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका साध्या पुस्तक दुकानातून सुरू झालेला प्रवास आज उत्तर भारतातील आघाडीच्या खासगी विद्यापीठांपैकी एक असलेल्या गलगोटिया युनिव्हर्सिटीपर्यंत पोहोचला आहे. या यशामागे गलगोटिया युनिव्हर्सिटीचे संस्थापक सुनील गलगोटिया आहेत. त्यांनी आपल्या कौटुंबिक पुस्तक व्यवसायाला देशपातळीवरील शिक्षण समूहात रुपांतरित केले आणि सुमारे ३,००० कोटी रुपयांचे साम्राज्य उभारले.
गलगोटिया युनिव्हर्सिटीचे संस्थापक सुनील गलगोटिया असून, या विद्यापीठाची स्थापना 2011 साली करण्यात आली. सध्या विद्यापीठाचे CEO ध्रुव गलगोटिया आहेत, जे सुनील गलगोटिया यांचे पुत्र आहेत. हे विद्यापीठ ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्सप्रेसवे जवळ वसलेले असून येथे पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी स्तरापर्यंत शिक्षण दिले जाते. गलगोटिया कुटुंबाचा शैक्षणिक वारसा फार पूर्वीपासूनचा आहे.
उधार पैशांतून सुरू केले प्रकाशन व्यवसाय
मीडिया रिपोर्टनुसार, १९३० साली दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये ‘ई.डी. गलगोटिया अँड सन्स’ नावाचे पुस्तक दुकान कुटुंबाकडे होते. याच पुस्तक दुकानातून पुढे शिक्षण क्षेत्रातील भव्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुनील गलगोटिया यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८० च्या दशकात गलगोटिया पब्लिकेशन्सची स्थापना केली. त्यांनी आपले पहिले पुस्तक ९,००० रुपये उधार घेऊन प्रकाशित केले. या पुस्तकाचे नाव Power System Control and Stability होते. त्यानंतर त्यांना Barron’sच्या SAT, TOEFL, GRE आणि GMAT या परीक्षांच्या पुस्तकांचे भारतामधील वितरण हक्क मिळाले आणि व्यवसाय वेगाने वाढू लागला.
इन्स्टिट्यूटपासून युनिव्हर्सिटीपर्यंत
प्रकाशन व्यवसायानंतर सुनील गलगोटिया यांनी थेट शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. २००० साली केवळ ४०विद्यार्थ्यांसह Galgotia’s Institute of Management and Technology (GIMT) ची स्थापना केली. त्यानंतर Galgotia College of Engineering and Technology सुरू झाले अन् अखेर 2011 मध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीची स्थापना केली. आज गलगोटिया समूहात ४०,००० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर ४० हून अधिक देशांतील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात. येथे शिक्षण पूर्ण केलेले १ लाखांहून अधिक विद्यार्थी ९६ देशांमध्ये नोकरी करत आहेत.
रोबोडॉगमुळे विद्यापीठ वादात सापडले
सध्या गलगोटिया युनिव्हर्सिटी एका वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीमध्ये आयोजित AI समिटमध्ये विद्यापीठाने एका रोबोडॉगचे प्रदर्शन मांडले होते. विद्यापीठाने हा रोबोडॉग आपल्या विद्यार्थ्यांनी विकसित केल्याचा दावा केला होता. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर हा रोबोडॉग चीनमध्ये बनवलेला असल्याचा आरोप करण्यात आला. वाद वाढल्यानंतर हा रोबोडॉग समिटमधील स्टॉलवरून हटवण्यात आला.
Web Summary : Sunil Galgotia transformed his family's bookstore into Galgotias University. Starting with a loan, he built a ₹3,000 crore education empire. Currently, the university is in controversy over a Chinese-made robodog displayed at an AI summit, falsely claiming it was made by their students.
Web Summary : सुनील गलगोटिया ने अपने परिवार की किताबों की दुकान को गलगोटिया विश्वविद्यालय में बदल दिया। कर्ज से शुरुआत करके, उन्होंने ₹3,000 करोड़ का शिक्षा साम्राज्य बनाया। फिलहाल, विश्वविद्यालय एक चीनी रोबोडॉग को लेकर विवाद में है, जिसे AI शिखर सम्मेलन में प्रदर्शित किया गया और गलत दावा किया गया कि यह उनके छात्रों द्वारा बनाया गया था।