Join us
Daily Top 2Weekly Top 5

जैवइंधन भरून विमान झेपावले; भारतात पहिले यशस्वी उड्डाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 07:40 IST

स्पाइसजेटचा प्रयोग : खर्चकपात व पर्यावरण रक्षणाचा दुहेरी लाभ

नवी दिल्ली : स्पाइसजेट या खासगी विमान वाहतूक कंपनीने जैवइंधनावर विमान उडविण्याचा भारतातील पहिला प्रयोग सोमवारी यशस्वी केला. डेहराडून येथून उडालेले हे चाचणी विमान २५ मिनिटांच्या उड्डाणानंतर दिल्लीत उतरले. जैवइंधनाच्या या पहिल्या चाचणी उड्डाणासाठी बॉम्बार्डियर क्यू-४०० जातीचे विमान वापरण्यात आले. एकूण ७८ प्रवासी क्षमतेच्या विमानात विमान वाहतूक महासंचालनालयाचे व विमान कंपनीचे अधिकारी होते.

स्पाइसजेटकडे अशी २२ विमाने आहेत. हे विमान दिल्लीत उतरले, तेव्हा विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू, विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितिन गडकरी व पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान आवर्जून उपस्थित होते. या उड्डाणासाठी ७५ टक्के नेहमीचे विमानाचे इंधन व २५ टक्के जैवइंधन वापरले आहे. वापरलेले जैवइंधन डेहराडून येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पेट्रोलियम’ने जट्रोफा (मोगली एरंड) या वनस्पतीपासून तयार केले. खर्चात कपात व पर्यावरणास हानिकारक कार्बनचे कमी उत्सर्जन असे जैवइंधनाचे दुहेरी फायदे आहेत. अमेरिका व आॅस्ट्रेलियात जैवइंधनावर विमाने चालविण्याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. मात्र, जगात नियमित व्यापारी उड्डाणासाठी याचा वापर झालेला नाही. स्पाइसजेटचे सीएमडी अजय सिंग म्हणाले की, जैवइंधनाच्या वापरामुळे पारंपरिक इंधनात ५० टक्क्यांपर्यंत बचत झाल्याने भाडे कमी करणेही शक्य होईल. अशा मिश्र इंधनाचा नियमित उड्डाणांसाठी केव्हापासून वापर करणार, याची माहिती स्पाइसजेटने लगेच दिली नाही. पारंपरिक इंधनाच्या वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वच खासगी विमान कंपन्या तोट्यात गेल्या आहेत. त्यामुळे अशा इंधनाचा वापर आर्थिक गरज म्हणून अपरिहार्य ठरेल, हे नक्की. इंडिगोने पाच वर्षांपूर्वी खर्च कमी करण्यासाठी ताफ्यातील काही विमाने मिश्र जैवइंधनावर चालविण्याचा विचार सुरू केला होता, परंतु सिंगापूरहून तुलनेने स्वस्त इंधन मिळण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यावर तो विचार मागे पडला होता.

पंतप्रधान मोदी यांनी १० आॅगस्ट रोजी नवे जैवइंधन धोरण जाहीर केले आणि आज लगेच विमान वाहतूक क्षेत्रात त्याची अंमलबजावणी झाल्याने ही घटना खूप महत्त्वाची आहे. जैवइंधनांवरील ‘जीएसटी’ आधीच कमी केला आहे.- धर्मेंद्र प्रधान,केंद्रीय पेट्रोलियममंत्री

टॅग्स :स्पाइस जेटव्यवसाय