Join us
Daily Top 2Weekly Top 5

होर्मुझ संकटात भारताला दिलासा; २० तेल अन् LPG टँकर्स लवकरच भारताच्या दिशेने रवाना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:07 IST

Fuel Crisis: तेल आणि एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Fuel Crisis: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे निर्माण झालेल्या तेल आणि एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. इराणच्या ताब्यात असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुजमार्गे २० तेल टँकर भारतात येण्यासाठी सज्ज असून, फक्त इराणच्या अंतिम परवानगीच्या प्रतिक्षेत आहेत. या संदर्भात भारत आणि इराण यांच्यात सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. एकदा का इराणकडून परवानगी मिळाली की, लगेच हे तेल टँकर भारतात दाखल होतील.

मोदींची इराण राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा

खाडी देशांमधून तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान होर्मुजमधून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.

२० टँकर भारताकडे येण्याच्या तयारीत

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, होर्मुज मार्गातून जाण्यासाठी तयार असलेल्या २० टँकरांपैकी १० टँकर एलपीजी (LPG) घेऊन येत आहेत, जे इंडियन ऑयल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या भारतीय रिफायनरी कंपन्यांनी कराराद्वारे घेतले आहेत. याशिवाय, ५ टँकर कच्चे तेल घेऊन येत आहेत. तर, उर्वरित टँकर इतर रिफायनरी कंपन्यांसाठी इंधन घेऊन येत असल्याचे सांगितले जात आहे.

एलपीजी आणि एलएनजीसाठी पश्चिम आशियावर अवलंबून भारत

भारताची तेल आणि गॅस पुरवठ्यासाठी पश्चिम आशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व आहे. अहवालानुसार भारताच्या एलएनजी (LNG) आयातीपैकी सुमारे दोन-तृतीयांश हिस्सा या प्रदेशातून येतो. तर एलपीजी आयातीचा जवळपास संपूर्ण पुरवठा खाडी देशांमधूनच केला जातो. सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुज जवळपास बंद असल्याने पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे.

परराष्ट्र स्तरावर चर्चेला वेग

या संकटावर तोडगा काढण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी अलीकडील काळात तीन वेळा चर्चा केली आहे. दोन्ही देशांदरम्यान सुरक्षित मार्ग आणि जहाजांच्या संरक्षणाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

पर्शियन आखातात भारताचे २८ जहाज

सरकारने दिलेल्या माहितीनुसार सध्या फारसच्या आखात परिसरात भारतीय ध्वज असलेली २८ जहाजे कार्यरत आहेत. पैकी २४ जहाजे होर्मुजच्या पश्चिम भागात आहेत, ज्यावर ६७७ भारतीय नाविक कार्यरत आहेत. तर ४ जहाजे जलडमरूमध्याच्या पूर्व भागात आहेत, ज्यावर १०१ भारतीय चालक दल सदस्य आहेत.

होर्मुज बंदच राहणार

दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी जाहीर केले की, होर्मुजमार्ग बंदच ठेवण्यात येईल. पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्या भाषणात त्यांनी अमेरिके आणि इस्रायलवर दबाव आणण्यासाठी हा निर्णय कायम ठेवण्याचे संकेत दिले. होर्मुज हा जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक मानला जातो. जगातील कच्च्या तेलाच्या सुमारे २० टक्के पुरवठा या मार्गातून होतो. हा मार्ग सध्या बंद असल्यामुळे अनेक देशांवर उर्जासंकट आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Approval? 20 Oil, LPG Tankers Soon Headed to India

Web Summary : Amid fuel crisis, 20 oil and LPG tankers are ready to sail to India via Hormuz, awaiting Iran's final approval. Discussions on security are ongoing. Modi discussed smooth oil supply with Iran's President. The Strait's closure impacts India's energy imports.
टॅग्स :इंधन टंचाईअमेरिका-इस्रायल-इराण वॉरभारतखनिज तेल