Harshad Mehta Scam 1992 Story: भारतीय शेअर बाजाराच्या (Share Market) इतिहासात काही नावं अशी नोंदवली गेली आहेत, जी नेहमी चर्चेत राहतात. ही नावं कधी प्रेरणा म्हणून, तर कधी धोक्याची सूचना म्हणून लक्षात ठेवली जातात. हर्षद मेहता हे त्या नावांपैकीच एक आहे. एका सामान्य कार डीलरच्या घरी जन्मलेला हा मुलगा पुढे जाऊन दलाल स्ट्रीटचा 'बिग बुल' बनला. हर्षद मेहताच्या प्रवासात त्याच्या कमाईची जितकी चर्चा झाली तितकीच्या त्याच्या पतनाचीही चर्चा झाली. हर्षद मेहताचा वादळी प्रवास कसा होता जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
सामान्य सुरुवात, असामान्य महत्त्वाकांक्षा
हर्षद मेहताचं बालपण मुंबईतील कांजूरमार्ग परिसरातील एका छोट्या वसाहतीत गेलं. त्याचे वडील कार डीलर होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार मजबूत नव्हती, पण हर्षदमध्ये काहीतरी मोठे करण्याची जिद्द पहिल्यापासून होती. तो अभ्यासात सामान्य असला तरी, त्याला आकडे, पॅटर्न आणि डील्स समजून घेण्याची आवड होती. याच आवडीनं त्याला पुढे आर्थिक जगताकडे नेलं. कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने विमा एजंट, सेल्समन आणि नंतर एका ब्रोकरेज फर्ममध्ये क्लार्क अशा अनेक लहान नोकऱ्या केल्या. इथूनच त्याचं नशीब बदलू लागलं. बाजारातील हालचाली, किमतीतील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांचे वर्तन तो खूप लवकर समजू लागला.
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
दलाल स्ट्रीटवर पहिलं पाऊल
१९८० च्या दशकात हर्षद मेहतानं शेअर बाजारात प्रवेश केला. सुरुवातीला लहान डील्स, त्यानंतर मोठ्या डील्स... त्याच्या आकलनशक्तीनं आणि वेगानं, ब्रोकरेज फर्म्सचं लक्ष वेधून घेतलं. लवकरच त्यानं स्वतःची फर्म सुरू केली. त्या काळात भारतातील शेअर बाजार फारसा विकसित झालेला नव्हता. मर्यादित गुंतवणूकदार, कमी नियम आणि किचकट ट्रेडिंग प्रणाली होती.
हर्षदनं याच त्रुटींना आपले बलस्थान बनवलं. तो कंपन्यांच्या शेअर्समध्ये वेगाने ट्रेडिंग करून 'बुल रन' चालवण्यात माहीर झाला. त्याने एका फोनवर शेअर्सचे भाव वाढवले आणि बाजारात 'बिग बुलनं जिथे हात ठेवावा, तिथे सोनंच सोनं' अशी म्हण प्रसिद्ध झाली. अक्री ग्लास, एसीसी, व्हिडिओकॉन, टाटा आयर्न यांसारखे अनेक शेअर्स त्याच्यामुळे गगनाला भिडले. गुंतवणूकदार त्याला देवाप्रमाणे मानू लागले. प्रसारमाध्यमांनी त्याला 'बिग बुल ऑफ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज' असं संबोधलं.
बँकांच्या सिस्टीममधील त्रुटी आणि...
१९९१–९२ या काळात हर्षदनं सरकारी बँकांमध्ये होणाऱ्या रेडी-फॉरवर्ड (RF) डील्स मध्ये एक पळवाट शोधली. हा सरकारी रोख्यांचा व्यवहार होता, जो त्या वेळी फार कमी लोकांना समजत होता. याच RF डील्सचा वापर करून हर्षदनं बँकांकडून कागदपत्रांच्या नोंदीशिवाय हजारो कोटी रुपये बाजारात गुंतवले. या पैशांनी त्यानं अनेक शेअर्समध्ये तेजी आणली आणि किमती अनेक पटीने वाढवल्या. ACC चा शेअर २०० रुपयांवरून १०,००० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळच्या हिशोबानं हे अशक्य होतं.
पण हा फुगा फार काळ टिकला नाही. एप्रिल १९९२ मध्ये पत्रकार सुचेता दलाल यांनी हा घोटाळा उघड केला की, शेअर बाजारातील या तेजीमागे सरकारी बँकांचे गायब झालेले पैसे आहेत. हा ५,००० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा होता.
'बिग बुल'चं पतन
घोटाळा उघडकीस येताच बाजार कोसळला. गुंतवणूकदारांना मोठं नुकसान झालं. हर्षद मेहताला अटक झाली. खटले, कोर्ट, मीडिया ट्रायल... सर्व काही त्याच्या विरोधात गेलं. १९९२ नंतर त्याचे साम्राज्य हळूहळू कोसळत गेले. २००१ मध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्याच वर्षी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. अवघ्या ४७ व्या वर्षी एका अशा व्यक्तीचा अंत झाला, ज्याने एकेकाळी संपूर्ण बाजार आपल्या मुठीत ठेवला होता.
हर्षद मेहता घोटाळ्यामुळे आर्थिक प्रणालीत मोठे बदल
या घोटाळ्यानंतर SEBI ला अधिक मजबूत अधिकार मिळाले. बँकांचे व्यवहार डिजिटल आणि शोधण्यायोग्य म्हणजेच ट्रेसेबल झाले. स्टॉक एक्सचेंजमध्ये पारदर्शकता वाढली. नवे नियम, नवी देखरेख आणि नवीन तंत्रज्ञान आलं. हा घोटाळा निश्चितच चुकीचा होता, पण या घटनेनंतर भारताचा बाजार सुरक्षित आणि आधुनिक बनवण्याच्या दिशेनं मोठं पाऊल उचललं गेलं.
Web Summary : Harshad Mehta, a car dealer's son, rose to become a stock market icon before his 1992 scam exposed banking loopholes. His actions triggered significant reforms, enhancing market transparency and security despite his downfall and untimely death.
Web Summary : कार डीलर का बेटा हर्षद मेहता, शेयर बाजार का दिग्गज बना, लेकिन 1992 के घोटाले ने बैंकिंग खामियां उजागर कर दीं। उसके कार्यों से बाजार में पारदर्शिता और सुरक्षा बढ़ी, हालांकि उसका पतन और असामयिक मृत्यु हो गई।