Join us

बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 16:05 IST

FPI Outflow : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे.

Foreign Investors Outflow: भारतीय शेअर बाजारातील तेजीला सध्या ब्रेक लागलेला दिसतोय. अमेरिकेसोबतचा व्यापारी तणाव, रुपयाचे अवमूल्यन आणि कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमी असलेले तिमाही निकाल बाजारात चिंतेचे वातावरण आहे. परिणामी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) बाजारातून सतत पैसे काढून घेत आहेत. केवळ ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यातच त्यांनी तब्बल २०,९७५ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.

२०२५ मध्ये १.१६ लाख कोटींची विक्रीडिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, २०२५ या वर्षात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून एकूण १.१६ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. याआधी, जुलैमध्येही त्यांनी १७,७४१ कोटी रुपये काढले होते. मात्र, त्यापूर्वी मार्च ते जून या तीन महिन्यांत त्यांनी भारतीय बाजारात ३८,६७३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

माघारीची प्रमुख कारणेशेअर बाजारातील तज्ज्ञांनुसार, परदेशी गुंतवणूकदार पैसे काढत असण्याची अनेक कारणे आहेत.

  • जागतिक अनिश्चितता: रशिया-युक्रेन युद्धासारखे भू-राजकीय तणाव आणि अमेरिकेच्या व्याजदरांमध्ये असलेली अनिश्चितता यामुळे भारतासारख्या विकसनशील बाजारपेठांकडे गुंतवणूकदार कमी आकर्षित होत आहेत, असे मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्च इंडियाचे हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले.
  • कंपन्यांचे कमकुवत निकाल: कंपन्यांनी जाहीर केलेले तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळेही FPIs विक्री करत आहेत.
  • उच्च मूल्यांकन: भारतीय शेअर बाजारातील अनेक शेअर्सचे मूल्यांकन सध्या खूप जास्त असल्याने गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत.
  • व्यापारी तणाव: अमेरिका-भारत यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये आलेला तणाव, विशेषतः रशियन तेलाच्या खरेदीवरून, गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण करत आहे.

भविष्यात काय होऊ शकते?एंजेल वनचे वकार जावेद खान यांनी एक सकारात्मक बाजू सांगितली आहे. त्यांच्या मते, अमेरिका आणि रशियामधील तणाव कमी झाल्यामुळे भारतावर २७ ऑगस्टपासून लादला जाणारा २५% अतिरिक्त टॅरिफ लागू होण्याची शक्यता कमी आहे. जर असे झाले तर त्याचा बाजारावर चांगला परिणाम दिसून येईल. तसेच, भारताची क्रेडिट रेटिंग वाढल्यामुळेही FPIs पुन्हा आकर्षित होऊ शकतात.

वाचाघरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?

सध्या परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढत असले तरी, त्यांनी बॉण्ड्समध्ये ४,४६९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याचा अर्थ, भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्यांचा विश्वास अजूनही कायम आहे.

टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकटॅरिफ युद्ध