Join us  

"कारागृहातच मेलो तर बरं होईल..."! ...म्हणून न्यायाधिशांसमोरच जेट एअरवेजचे संस्थापक गोयल यांना रडू कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 11:29 AM

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नरेश गोयल यांना गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला बँकच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. ते सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

 आपण जगण्याची आस सोडली आहे. अशा स्थितीत जगण्यापेक्षा कारागृहातच मेलेले बरे, असे कॅनरा बँकेची 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) यांनी शनिवारी मुंबईच्या विशेष न्यायालयात, हात जोडत म्हटले आहे. न्यायालयाच्या नोंदीनुसार, 70 वर्षीय नरेश गोयल यांनी भरल्या डोळ्यांनी सांगितले की, त्यांना त्याची पत्नी अनिता यांची अत्यंत आठवण येत आहे. त्या कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजवर आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नरेश गोयल यांना गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला बँकच्या फसवणुकीप्रकरणी अटक केली आहे. ते सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांनी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांनी वैयक्तिक सुनावणीची विनंती केली. न्यायाधीशांनी त्यांची विनंती मान्य केले होती.

हात जोडत काय म्हणाले गोयल? -न्यायालयाच्या 'डायरी'नुसार, गोयल यांनी हात जोडून आणि थरथरत, त्यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगितले. गोयल म्हणाले, आपली पत्नी बेडवर पडून आहे. त्यांच्या एकुलत्या एका मुलीची प्रकृतीही बरी नाही. तुरुंगातील कर्मचार्‍यांनाही मदतीच्या बाबतीत काही मर्यादा आहेत. यासंदर्भात, न्यायाधीस म्हणाले, मी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. ते त्यांचे मत मांडत असताना, मी त्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले. त्याचे शरीर थरथरत असल्याचे दिसून आले. त्यांना उभे राहण्यासाठीही आधाराची आवश्यकता आहे.

काय म्हणाले न्यायाधीश?यावेळी, गोयल यांनी आपली प्रकृती, पत्नीचे आजारपण, जेजे रुग्णालयात येण्या जाण्यासाठी होत असलेला त्रास, यासंदर्भात सविस्तर सांगितले. न्यायाधीश म्हणाले, ते जे काही सांगत होते. ते मी काळजीपूर्वक ऐकले. तसेच, त्यांना निराधार सोडले जाणार नाही, असे आश्वासनही दिले आहे. त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची शक्य ती सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल आणि त्यांच्यावर उपचार केले जातील.

पुढची सुनावणी 16 जानेवारीला- यावेळी न्यायालयाने गोयल यांच्या वकिलाला त्यांच्या प्रकृतीसंदर्भात आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. गेल्या महिन्यात गोयल यांनी आपल्या जामीन अर्जात, हृदय, प्रोस्टेट, हाडे आदी आजारांचा हवाला दिला होता. तसेच, हे तर्कसंगत आधार आहेत की आपण गुन्हेगार नाही, असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या अर्जावर ईडीनेही उत्तर दाखल केले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होईल. 

टॅग्स :जेट एअरवेजन्यायालयअंमलबजावणी संचालनालयतुरुंगकर्करोग