Join us

पॉलिसी घेऊन विसरले, लाखो लोकांचे अब्जावधी रुपये दाव्याविना LIC कडे पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 21:16 IST

LIC Policy Unclaimed Amount: भारतातील प्रमुख आणि सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीकडे तब्बल ८८०.९३ कोटी रुपये एवढी रक्कम दाव्याविना पडून आहे.

भारतातील प्रमुख आणि सरकारी विमा कंपनी असलेल्या एलआयसीकडे तब्बल ८८०.९३ कोटी रुपये एवढी रक्कम दाव्याविना पडून आहे. सोमवारी वित्तराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबतची माहिती लोकसभेमध्ये दिली. त्यांनी सांगितले की, २०२३-२०२४ या आर्थिक वर्षादरम्यान, ३ लाख ७२ हजार २८२ पॉलिसीधारक मॅच्युरिटी बेनिफिट घेण्यात अपयशी ठरले. या विमा पॉलिसीधाकरांना या रकमेवर दावा करण्यासाठी माहिती देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.

जर तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची विमा पॉलिसी असेल. तसेच तिची मॅच्युरिटी पूर्ण झाली असेल, तर तुम्हीही अशा रकमेसाठी दावा करू शकता. तसेच तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने पॉलिसी घेतली असेल आणि ती आता या जगात नसेल तर अशा पॉलिसीची रक्कम मिळवण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने दावा करू शकता.

जर तुम्हाला अनक्लेम रक्कम तपासायची असेल तर तुमच्याकडे काही कागदपत्रं असणं आवश्यक आहे. त्यामध्ये एलआयसी पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारकाचं नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड या कागदपत्रांचा समावेश आहे.

जर कुठल्या पॉलिसीधारकाला त्याच्या नावावर एलआयसी पॉलिसीची रक्कम ही दाव्याविना पडून आहे की नाही हे जाणून घ्यायचं असल्यास तुम्ही इंटरनेटवर एलआयसीच्या साईटवर जाऊन काही स्टेप फॉलो कराव्या लागतील. 

- सर्वप्रथम एलआयसीच्या https://licindia.in/home या संकेतस्थळावर जा- त्यानंतर कस्टमर्स सर्व्हिस आणि अनक्लेम्ड अकाऊंट्स ऑफ पॉलिसी होल्डर्स सिलेक्ट करा-त्यानंतर पॉलिसी क्रमांक, नाव (अनिवार्य), जन्मतारीख (अनिवार्य) आणि पॅनकार्डची माहिती नोंदवा. - त्यानंतर सबमित बटणावर क्लिक करा आणि सविस्तर माहिती चेक करा. 

जर एलआयसीकडे तुमचीही अनक्लेम्ड रक्कम असेल, तर तुम्ही एलआयसी एजंट्सच्या माध्यमातून  किंवा एलआयसीच्या ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रांसह दावा करू शकता. 

जर कुठलीही रक्कम एलआयसीकडे दहा वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत दाव्याविना पडून राहिली असेल तर संपूर्ण रक्कम ही सिनियर सिटिझन कल्याण फंडामध्ये वळवली जाते. तसेच नियमानुसार या रकमेचा वापर हा ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांसाठी होतो. दाव्याविना असलेल्या रकमेवर आयआरडीएआयच्या परिपत्रकानुसार दाव्याविना असलेल्या रकमेमध्ये विमाधारकाकडून ठेवण्यात आलेल्या कुठल्याही रकमेचा समावेश होतो.  

टॅग्स :एलआयसीपैसा