Join us  

"गेल्या ५ आठवड्यांपासून..," मृत्यू आणि अटकेच्या अफवांवर Vineeta Singh यांनी अखेर सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 1:23 PM

गेल्या काही काळापासून विनीता सिंह यांच्या मृत्यू आणि अटकेची खोटी बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषत: फेसबुकवर पसरवली जात होती.

शुगर कॉस्मेटिक्सच्या संस्थापक आणि सीईओ विनीता सिंह (Vineeta Singh) यांना तुम्ही ओळखतच असाल. शार्क टँक इंडियामध्ये त्या शार्कच्या भूमिकेत दिसल्या होत्या. विनिता सिंह यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला. खरं तर, गेल्या काही काळापासून विनीता सिंह यांच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषत: फेसबुकवर पसरवली जात होती. जेव्हा हे थांबलं नाही तेव्हा विनीता सिंह यांना एक्स प्लॅटफॉर्मवर मदत मागावी लागली. आपण या बनावट बातम्यांबाबत मेटा आणि मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार केली, पण त्यावर तोडगा निघाला नाही, असं त्यांनी म्हटलं. 

"गेल्या ५ आठवड्यांपासून मी माझ्या मृत्यूच्या खोट्या बातम्या आणि माझ्या अटकेच्या पेड पीआरशी संघर्ष करत आहे. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर अनेकवेळा मेटामध्ये तक्रार करण्यात आली. मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार केली, मात्र त्यानंतरही ही बातमी थांबत नव्हती. जेव्हा लोक घाबरून माझ्या आईला फोन करतात तेव्हा सर्वाधिक वाईट वाटतं. या काही पोस्ट्स आहेत. काही सूचना?" असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय. 

 

सुरू होतं पेड प्रमोशन 

विनीता सिंह यांनी त्यांच्या पोस्टसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली जात होती. एका पोस्टमध्ये त्याच्या फोटोसोबत 'हा भारतासाठी दुःखाचा दिवस आहे. आम्ही विनीता सिंह यांना गुडबाय म्हणतो,' असं म्हटलं होतं. 'संपूर्ण भारतासाठी हा एक दुःखाचा दिवस आहे. अलविदा, विनीता सिंह,' असं आणखी एका पोस्टमध्ये नमूद केलं होतं. पेड पीआरद्वारे पैसे देऊन या बातम्यांचा प्रचार केला जात असल्याचं विनीता सिंह यांनी सांगितलं. विनीता सिंह यांच्या या पोस्टवर मुंबई पोलिसांनीही कमेंट केली आहे. यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केली. अशा प्रकारच्या फेक न्यूजची संपूर्ण सीरिज फेसबुकवर चालवली जात असल्याचं विनीता सिंह यांनी म्हटलंय.

टॅग्स :सोशल मीडियाव्यवसायफेसबुक