Join us

अन्नमंत्र्यांमुळे साखर कारखानदार धास्तावले, किंमत वाढवून देण्यास असमर्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 05:23 IST

sugar mills : देशातील खासगी साखर कारखानदारांचा संघ असलेल्या इस्माची वार्षिक सभा शुक्रवारी दिल्लीत झाली.

- विश्वास पाटील

कोल्हापूर : केंद्रीय अन्नमंत्री पीयूष गोयल यांनी साखरेची खरेदी किंमत वाढविण्यास केंद्र सरकार तयार नाही, असे विधान केल्याने महाराष्ट्रातील साखर कारखानदारीच्या पोटात गोळा आला आहे. कारण हंगाम निम्म्यावर आला आहे आणि सर्वांनीच आता एकरकमी एफआरपी देण्यास सुरुवात केली आहे. साखरेच्या सध्याच्या ३१ रुपये खरेदी किमतीवर शेतकऱ्यांना सध्याची सरासरी २,५०० ते ३,००० पर्यंतची एफआरपी देणे म्हणजे कारखाने पुन्हा तोट्यात ढकलण्यासारखेच आहे. त्यामुळे ही किंमत किमान ३५ रुपये करावी, अशी साखर कारखानदारांची मागणी आहे.देशातील खासगी साखर कारखानदारांचा संघ असलेल्या इस्माची वार्षिक सभा शुक्रवारी दिल्लीत झाली. त्यामध्ये मंत्री गोयल यांनी साखरेची खरेदी किंमत वाढवून देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यांच्या मते देशातील कारखान्यांना ६० लाख टन निर्यातीचे ३,५०० कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे, शिवाय गेल्या वर्षीची निर्यात आणि इथेनॉल अनुदानाचे ५,३६१ कोटी रुपये येत्या आ‌ठवड्याभरात सरकार देणार आहे. 

महागाई निर्देशांक वाढतो हे खरे असले, तरी म्हणून खरेदी किंमत वाढविली जाणार नाही, असा निष्कर्ष मंत्री गोयल यांच्या विधानावरून काढता येणार नाही. ही किंमत वाढेल, याची खात्री वाटते.- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ दिल्ली

टॅग्स :साखर कारखाने