Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीठ महागलं... 5 टक्के जीएसटी लागू होताच चाट अन् समोसा दरातही वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 19:26 IST

इंधन दरवाढ, दुसरीकडे गॅस दरवाढीनंतर आता खाद्य पदार्थांवरही 5 टक्के जीएसटी लागू केल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे

नवी दिल्ली - केंद्र सरकारने खाद्य पदार्थांवर 5 टक्के जीएसटी लावल्यामुळे बाजारातील अनेक खाद्य पदार्थही महागले आहेत. अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. अमूल आणि पराग या ब्रँडने दूध, दही आणि ताकाच्या किंमतीत वाढ केली आहे. तर, सर्वसामान्यांच्या बजेटमधला चहा, समोसा, कचोरी आणि चाट या पदार्थांच्याही किंमती वाढल्या आहेत. महागाईने अगोदरच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला हा आणखी एक धक्का आहे.

इंधन दरवाढ, दुसरीकडे गॅस दरवाढीनंतर आता खाद्य पदार्थांवरही 5 टक्के जीएसटी लागू केल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. 18 जुलैपासून तांदूळ, गव्हाचं पीठ, मैदा, दूध, डाळ, दही, ताक, लस्सी आणि दैनंदिन वापरात येणारे पदार्थही महाग झाले आहेत. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा बोझा वाढला आहे. शहरातील हॉटेल आणि चाट दुकानाच्या भावफलकात नवीन दरवाढ झाल्याचं दिसून येत आहे. 8 ते 10 रुपयांना विकली जाणारी कचोरी आता 12 ते 15 रुपयांना विकली जात आहे. 

तसेच 8 ते 10 रुपयांना मिळणारा चहा आणि समोसा अनुक्रमे 10 ते 12 रुपयांपर्यंत महागले आहेत. त्यासोबतच, पिझ्झा-बर्गर यांचेही भाव वधारले आहेत. जीएसटी लावण्यात आल्याचे परिणाम मंगळवारी दिसून आले. दिल्ली शहरातील गल्ला मंडी येथे 25 ते 30 रुपये किलोने विकणारा तांदूळ आता 30 ते 32 रुपये किलोपर्यंत दरवाढ झाला आहे. तर, 100 रुपये किलोपर्यंत मिळणारी तूरडाळही 110 ते 115 रुपये किलोपर्यंत वाढली आहे. 18 जुलैपासून जीएसटी लागू केल्यामुळे भाजीमंडईतही भाववाढ झाल्याचं दिसून येत आहे.  

टॅग्स :जीएसटीनिर्मला सीतारामनभाज्या