घरी जेवण बनवण्याचा कंटाळा आला किंवा वेळेअभावी शक्य झालं नाही की, बाहेरून जेवण मागण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पण, बाहेरून जेवण मागवताना भारतीय नेमकं काय मागवतात आणि २०२४ या वर्षात कोणता खाद्यपदार्थ सर्वाधिक मागवला गेला, याबद्दलचा रिपोर्ट समोर आला आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी कंपनीने रिपोर्टमध्ये भारतीयांची सर्वाधिक पसंती कोणत्या कोणत्या खाद्यपदार्थाला मिळाली याबद्दल माहिती दिली आहे.
स्विगीच्या रिपोर्टमध्ये मोजके असे खाद्यपदार्थ आहे, जे भारतीयांनी २०२४ मध्ये जास्त मागवले आहेत. यात दुसऱ्या क्रमांकावर डोसा आहे. स्विगीवरून २३ मिलियन ऑर्डर डोसाच्या दिल्या गेल्या. नाश्तासाठी ८.५ मिलियन डोसा, तर ७.८ मिलियन इडलीच्या ऑर्डर डिलिव्हर केल्या गेल्या.
डोसा ऑर्डर करणाऱ्यांमध्ये बंगळुरूतील ग्राहक सर्वाधिक आहे. तब्बल २.५ मिलियन डोसा ऑर्डर वर्षभरात दिल्या गेल्या. दिल्लीत मात्र नाश्त्यासाठी छोले, चंदीगडमध्ये आलू पराठा आणि कोलकातामध्ये कचोरीला पसंती दिली गेली.
या खाद्यपदार्थांच्या मिळाल्या जास्त ऑर्डर
स्विगीच्या रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये चिकन रोलच्या ऑर्डर जास्त मिळाल्या होत्या. २.४८ मिलियन चिकन रोल ऑर्डर केले गेले. त्यानंतर चिकन मोमोजच्या १.६३ मिलियन ऑर्डर दिल्या गेल्या. आलू फ्राइजच्या १.३ मिलियन ऑर्डर स्विगीला मिळाल्या. मध्यरात्रीच्या वेळी लोकांनी चिकन बर्गरच्या सर्वाधिक ऑर्डर दिल्या. या ऑर्डर रात्री १२ ते २ वाजेच्या दरम्यान दिल्या गेल्या.
बिर्याणीला भारतीयांची पहिली पसंती
स्विगीच्या रिपोर्टनुसार, २०२४ या वर्षात भारतीयांनी सर्वाधिक ऑर्डर बिर्याणीच्या दिल्या. बिर्याणीच्या ८३ मिलियन ऑर्डर स्विगीला वर्षभरात मिळाल्या. आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येक मिनिटाला १५८ बिर्याणीच्या ऑर्डर दिल्या गेल्या. म्हणजेच प्रत्येक सेंकदाला बिर्याणीच्या दोन ऑर्डर स्विगीला मिळाल्या.
स्विगीने म्हटले आहे की, त्यांच्या २.८ नवीन ग्राहकांनी सर्वात आवडता खाद्यपदार्थ म्हणून बिर्याणीची निवड केली आहे. ही माहिती १ जानेवारी २०२४ ते २२ नोव्हेंबर २०२४ या काळातील आहे.
सलग ९ वर्षांपासून बिर्याणी पहिल्या क्रमांकावर
भारतात सर्वाधिक ऑर्डर केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये बिर्याणी पहिल्या क्रमांकावर आहे. स्विगीच्या माहितीनुसार, नॉन व्हेज बिर्याणीच्या ऑर्डर जास्त मिळाल्या. हैदराबादमध्ये सर्वाधिक म्हणजे ९.७ मिलियन ऑर्डर बिर्याणीच्या दिल्या गेल्या.
बंगळुरू ७.७ मिलियन ऑर्डरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर चेन्नई ४.६ मिलियनसह तिसऱ्या स्थानी आहे. चिकन बिर्याणी बरोबरच मटण बिर्याणीही जास्त मागवली गेली, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.