Join us  

विक्रीच्या दबावामुळे शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ७४६ अंशांनी खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 6:12 AM

दिवसभरामध्ये संवेदनशील निर्देशांक ७४६.२२ अंश म्हणजेच १.५० टक्के खाली येऊन ४८,८७८.५४ अंशांवर बंद झाला. गेल्या महिनाभरातील ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे.

मुंबई : वाढलेल्या शेअर बाजाराचा फायदा घेत नफा कमावण्यासाठी करण्यात आलेल्या विक्रीचा शेअर बाजाराला फटका बसला असून, बाजारात मोठी घसरण झालेली दिसून येत आहे. जागतिक बाजारांमध्ये असलेल्या मंदीच्या वातावरणाचा नकारात्मक परिणाम आशियासह आपल्या शेअर बाजाराला जाणवला. गुरुवारीच मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ५० हजार अंशांचा पल्ला गाठला होता. मात्र, त्यापाठोपाठ बाजारावरील विक्रीचा दबाव वाढू लागला असून बाजार खाली येत आहे. शुक्रवारची सुरुवातच बाजार खाली येऊन झाली. दिवसभरामध्ये संवेदनशील निर्देशांक ७४६.२२ अंश म्हणजेच १.५० टक्के खाली येऊन ४८,८७८.५४ अंशांवर बंद झाला. गेल्या महिनाभरातील ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातही विक्रीसाठी मोठी गर्दी दिसून आली. येथील निर्देशांक (निफ्टी) २१८.४५ अंश म्हणजेच १.५ टक्क्यांनी खाली येऊन १४,३७१.९० अंशांवर बंद झाला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक असलेल्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांच्यामध्येही २ टक्क्यांहून अधिक घसरण झालेली दिसून आली. सेन्सेक्समधील ॲक्सिस बँकेच्या समभागांना विक्रीचा मोठा फटका बसला. हे समभाग सुमारे ४ टक्क्यांनी खाली आले.  त्याचप्रमाणे विविध बँका, रिलायन्स व एशियन पेंट्‌स या समभागांमध्ये मोठी घसरण झालेली दिसून आली. दुसरीकडे वाहन कंपन्यांच्या समभागांमध्ये मात्र चांगली वाढ झालेली दिसून आली. हिंदुस्तान युनिलीव्हर, अल्ट्राटेक, टीसीएस या समभागांमध्ये चांगली वाढ झाली. जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या मंदीच्या वातावरणाचा परिणाम आशियातील बाजारांमध्ये घसरणीच्या रूपाने दिसून आला. ही आहेत घसरणीची प्रमुख कारणे -- जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण- वाढलेल्या भारतीय बाजारांमध्ये नफा कमविण्यासाठी झालेली मोठी विक्री- जवळ येत असलेले या महिन्यातील डेरिव्हेटिव्हजची सौदापूर्ती - अ‌र्थसंकल्प जवळ येत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये अस्थैर्याची भावना

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारभारतअर्थव्यवस्था