Join us

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 06:42 IST

धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने-चांदीत घसरण झाली होती, मात्र  धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने ४५० रुपयांनी वधारले.

जळगाव : दीपोत्सवातील विविध मुहूर्तांवर भाववाढ झालेल्या सोने-चांदीच्या भावात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घसरण झाली. सोने ३०० रुपयांनी घसरून ७९ हजार ७०० रुपयांवर आले तर चांदीत थेट एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ९७ हजार ५०० रुपयांवर आली. धनत्रयोदशीनंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही सुवर्ण पेढ्यांमध्ये खरेदीचा उत्साह कायम होता. 

धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने-चांदीत घसरण झाली होती, मात्र  धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने ४५० रुपयांनी वधारले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ३० ऑक्टोबरला पुन्हा वाढ होऊन प्रथमच ते ८० हजार रुपयांवर पोहचले.  गुरुवारी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर शुक्रवारी  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यात ३०० रुपयांची घसरण होऊन ते ७९ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले. 

चांदीच्याही भावात धनत्रयोदशीच्या दिवशी एक हजार ५००, त्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन चांदी ९९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचले. गुरुवारी त्यात ५०० रुपयांची घसरण झाल्याने ती ९९ हजारांवर आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुन्हा एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ९७ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकांनी सोने-चांदी खरेदीचे नियोजन केले होते.  

टॅग्स :सोनं