Join us  

"जिओसोबत करार केल्यामुळे उत्पादन आणि तंत्रज्ञान वाढविण्यास मदत होईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 5:19 PM

गेल्या आठवड्यात सोशल मीडिया जायंट असलेल्या फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्दे'फेसबुक आणि रिलायन्स जिओच्या भागीदारीतून आम्हाला सर्व उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे जगासाठी काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आहे.'

नवी दिल्ली : रिलायन्स जिओसोबतफेसबुकने केलेल्या तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांच्या करारामुळे जगातील उर्वरित भागात उत्पादन आणि तंत्रज्ञान वाढविण्यास मदत होईल, असे मत फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरबर्ग यांनी व्यक्त केले आहे. 

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून भारतात JioMart सोबत काम करून एक चांगली खरेदी आणि कॉमर्सचा अनुभव तयार करणे, हे फेसबुकचे उद्दिष्ट असल्याचेही मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात सोशल मीडिया जायंट असलेल्या फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

फेसबुक आणि रिलायन्स जिओच्या भागीदारीतून आम्हाला सर्व उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे जगासाठी काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आहे. या व्हिजनला पुढे नेण्यासाठी आम्ही रिलायन्स जिओसोबत काम करण्यास उत्सुक आहोत, असे मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले. तसेच, आगामी महिन्यात किंवा वर्षात याचा सर्वत्र विस्तार केला जाईल. कंपनीची मजबूत बॅलन्स शीट या तिमाहीत एक 'महत्त्वपूर्ण मालमत्ता' असल्याचे सिद्ध झाले, असेही मार्क झुकरबर्ग म्हणाले.

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्याची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आम्हाला वाटते की, भारतात दीर्घकाळ अशी लघु उद्योगांची सेवा देण्याची आणि व्यवसाय सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संधी आहे. तसेच, जिओमार्टला एकत्र आणून भारतातील लाखो दुकाने व्हॉट्सअॅपवर जोडण्याद्वारे जिओचा छोटासा व्यावसायिक पुढाकार चांगला आहे, असे मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले. 

टॅग्स :फेसबुकरिलायन्स जिओजिओव्यवसायमार्क झुकेरबर्ग