Join us

नोकऱ्या गमावलेल्यांनाही परत मिळाल्या नोकऱ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 08:05 IST

भीती नाहीच! अनुभवी आयटी कर्मचाऱ्यांना मिळाला इतरत्र रोजगार

बंगळुरू : गेल्या १२ महिन्यांपासून माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 'एक्स्फेनो' या स्टाफिंग फर्मने दिलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात देशातील टॉप ७ आयटी कंपन्यांमध्ये १५ वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले ७,७००हून अधिक वरिष्ठ कर्मचारी नोकरी सोडून गेले. ही संख्या जवळपास २,०५,००० कर्मचाऱ्यांच्या ४ टक्के इतकी आहे.

टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा, कॉग्निझंट आणि एलटीआय माईंडट्री या कंपन्यांचा यात समावेश आहे. मात्र, नोकरी गमावलेल्या या कर्मचाऱ्यांपैकी ४८ टक्के लोकांना 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स' मध्ये (जीसीसी) नोकऱ्या मिळाल्या आहेत.

आयटी क्षेत्रात नोकर कपात झाली तरी, अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी रोजगाराचे इतर अनेक मार्ग खुले झाले आहेत.

नव्या संधींची कवाडे

आयटी क्षेत्रातील धीमा वृद्धीदर आणि एआयमुळे आयटी कंपन्यांना मध्यम व वरिष्ठ कर्मचारी कमी करावे लागले. पण, यामुळे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी इतर क्षेत्रांमध्ये संधी निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांची पुढची वाटचाल कशी?

कर्मचारी 'नॉन-टेक' क्षेत्रातः ९ टक्के लोकांनी 'नॉन-टेक' क्षेत्रात कामाला सुरुवात केली.

कर्मचाऱ्यांना 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स'मध्ये नोकरीः जवळपास निम्मे कर्मचारी जीसीसीमध्ये वरिष्ठ स्तरावर रूजू झाले.

कर्मचाऱ्यांना अन्य आयटी कंपन्यांमध्ये संधी: टियर-१ किंवा त्यापेक्षा कमी स्तरावरील इतर आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. 

टॅग्स :नोकरीभारत