Chanda Kochhar : आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) माजी सीईओ चंदा कोचर यांना एका मोठ्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. व्हिडिओकॉन कंपनीला ३०० कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या बदल्यात ६४ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता, ज्यात आता अपीलीय न्यायाधिकरणाने त्यांना दोषी ठरवले आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, ३ जुलै रोजी दिलेल्या आदेशात, न्यायाधिकरणाने स्पष्ट केले की, हे पैसे चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना व्हिडिओकॉनशी जोडलेल्या एका कंपनीमार्फत मिळाले होते. याला न्यायाधिकरणाने 'क्विड प्रो क्वो' म्हणजे 'कशाच्या तरी बदल्यात दुसरं काहीतरी मिळवणे' चे स्पष्ट प्रकरण म्हटले आहे.
काय आहे हे प्रकरण?ईडीने दावा केला होता की, चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत धोरणांचे उल्लंघन करून हे कर्ज दिले होते. न्यायाधिकरणाने ईडीचा हा दावा मान्य केला आहे. त्यांच्या मते, चंदा कोचर यांनी आपल्या पतीचे व्हिडिओकॉनशी असलेले व्यावसायिक संबंध बँकेपासून लपवले, जे बँकेच्या 'हितसंबंधांचा संघर्ष' (Conflict of Interest) नियमांविरुद्ध होते.
६४ कोटींचा 'पैशाचा खेळ'न्यायाधिकरणाच्या म्हणण्यानुसार, आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला ३०० कोटी रुपयांचे कर्ज देताच, त्याच्या दुसऱ्याच दिवशी व्हिडिओकॉनच्या 'एसईपीएल' (SEPL) या कंपनीकडून ६४ कोटी रुपये 'एनआरपीएल'ला (NRPL) हस्तांतरित करण्यात आले. कागदोपत्री 'एनआरपीएल' ही व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्या मालकीची होती. परंतु, प्रत्यक्षात ती दीपक कोचर यांच्या नियंत्रणात होती आणि ते तिचे व्यवस्थापकीय संचालक देखील होते. न्यायाधिकरणाने याला थेट लाचखोरीचा पुरावा मानले आहे.
मालमत्ता जप्तीचा ईडीचा निर्णय योग्य२०२० मध्ये, एका प्राधिकरणाने चंदा कोचर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ७८ कोटी रुपयांच्या मालमत्तेची जप्ती चुकीची ठरवली होती. मात्र, आता अपीलीय न्यायाधिकरणाने त्या प्राधिकरणाच्या निर्णयालाही चुकीचे म्हटले आहे. न्यायाधिकरणाने स्पष्ट केले की, त्या प्राधिकरणाने आवश्यक पुराव्यांकडे दुर्लक्ष केले आणि चुकीचा निष्कर्ष काढला. ईडीने सबळ पुरावे आणि घटनांच्या स्पष्ट वेळापत्रकाच्या आधारे मालमत्ता जप्त केली होती.
कर्ज देणे, पैसे हस्तांतरित करणे आणि दीपक कोचर यांच्या कंपनीला निधी पाठवणे हे सर्व चंदा कोचर यांनी सत्तेचा गैरवापर आणि नैतिकतेचे उल्लंघन दर्शवते, असे ट्रिब्युनलने म्हटले आहे. या निर्णयामुळे चंदा कोचर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.