Join us  

'हिंडनबर्ग'मुळे बसला फटका, तरीही अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीने कमावला 'जम्बो' नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 2:32 PM

हिंडनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली होती

Adani Transmission Share Price, Hindenburg Controversy: हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली होती. जानेवारी 2023 मध्ये, हिंडेनबर्गच्या खुलाशानंतर, समूह कंपन्यांच्या समभागांमध्ये लक्षणीय घट झाली होती. एका महिन्याहून अधिक काळ टिकलेल्या या घसरणीमुळे अदानी समूहाचे मार्केट कॅप 12 लाख कोटी रुपयांनी कमी झाले होते. परंतु अदानी समूहाच्या अदानी ट्रान्समिशनने (ATL) मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत प्रचंड नफा कमावला. कंपनीला झालेल्या नफ्याचा परिणाम शेअर्सवरही दिसून आला.

गेल्या वर्षी 237 कोटींचा निव्वळ नफा

अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (ATL) चा निव्वळ नफा 2022-23 च्या मार्च तिमाहीत 85.48 टक्क्यांनी वाढून 439.60 कोटी रुपये झाला. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की 2021-22च्या जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीने 237 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. त्यानंतरच्या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर 3,165.35 कोटी रुपयांवरून 3,494.84 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

निव्वळ नफा वाढून रु. 1,280.60 कोटी

एटीएलचा निव्वळ नफा 2022-23 आर्थिक वर्षासाठी 1,280.60 कोटी झाला. मागील आर्थिक वर्षात ते 1,235.75 कोटी रुपये होते. या कालावधीत एकूण उत्पन्न 13,840.46 कोटी रुपये होते, जे 2021-22 मध्ये 11,861.47 कोटी रुपये होते. आणखी एका निवेदनात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, "आम्ही पारेषण आणि वितरण क्षेत्रात आघाडीवर आहोत. कंपनीने कार्यक्षमता, कार्यप्रदर्शन आणि मालमत्तेच्या वाढीमध्ये सातत्याने नवीन बेंचमार्क सेट केले आहेत. अदानी ट्रान्समिशन जलद वाढीसाठी योग्य स्थितीत आहे."

हिंडनबर्ग यांनी अदानी समूहावर शेअरच्या किमतीत अफरातफर केल्याचा आरोप केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. गेल्या एका वर्षात 4,238 रुपयांचा उच्चांक गाठणारा अदानी ट्रान्समिशनचा शेअर मार्चमध्ये 630 रुपयांवर घसरला होता. या समभागाची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 630 रुपये आणि उच्च पातळी 4,238.55 रुपये आहे.

टॅग्स :गौतम अदानीअदानीशेअर बाजार