ESI Scheme : तुम्ही जर खासगी क्षेत्रात काम करत असाल तर ईएसआय योजनेतंर्गत मिळणाऱ्या सुविधांची माहिती असणे आवश्यक आहे. एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ESIC) च्या सदस्यांची संख्या ऑक्टोबरमध्ये ३ टक्क्यांनी वाढली आहे. आता ईएसआय सदस्यांची संख्या १७.८० लाख झाली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या वेतनश्रेणीच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की ऑक्टोबर २०२४ पर्यंत २१,५८८ नवीन संस्था ESI योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या आहेत. ESI योजना चालवण्याची जबाबदारी कर्मचारी राज्य विमा महामंडळाची आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतात.
ईएसआय योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?१ जानेवारी २०१७ पासून ज्या कर्मचाऱ्यांचा पगार २१ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे तेच या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेत कर्मचाऱ्यांची नावनोंदणी करणे ही कंपनीची जबाबदारी आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही ठराविक रक्कम जमा केली जाते. यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगाराच्या १.७५ टक्के आणि मालकाच्या बाजूने कर्मचाऱ्याच्या पगाराच्या ४.७५ टक्के इतके योगदान देण्याचा नियम आहे.
कोणत्या संस्था ESI योजनेच्या कक्षेत येतात?१० किंवा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्या आणि आस्थापना ESI योजनेच्या कक्षेत येतात. महाराष्ट्र आणि चंदीगडमध्ये, २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापना या ESI योजनेच्या कक्षेत येतात.
ईएसआय योजनेत कर्मचाऱ्यांना कोणते फायदे मिळतात
- जर एखाद्याला ईएसआय योजनेंतर्गत उपलब्ध मोफत उपचारांचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला ईएसआय दवाखान्यात किंवा रुग्णालयात जावे भरती होणे आवश्यक आहे. या योजनेद्वारे, विमाधारक व्यक्तीशिवाय, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांनाही मोफत उपचाराची सुविधा दिली जाते.
- सेवानिवृत्त कर्मचारी आणि कायमस्वरूपी अपंग विमाधारक व्यक्ती आणि त्यांच्या जोडीदाराला १२० रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर वैद्यकीय सेवा दिली जाते.
- विमा उतरवलेला वैद्यकीय रजेवर असेल तर त्याला एका वर्षातील जास्तीत जास्त ९१ दिवस वेतनाच्या ७० टक्के दराने रोख रक्कम दिली जाते.
- प्रसूती रजेदरम्यान, प्रसूतीच्या बाबतीत २६ आठवड्यांपर्यंत आणि गर्भपात झाल्यास ६ आठवड्यांपर्यंत महिलांना सरासरी पगाराच्या १०० टक्के रक्कम दिली जाते.
- जर एखाद्या विमाधारक कर्मचाऱ्याचा काम करताना मृत्यू झाला तर कुटुंबियांना निश्चित प्रमाणात मासिक पेन्शन दिली जाते. निवृत्तीवेतन ३ भागांमध्ये विभागले गेले आहे. प्रथम, विमाधारकाच्या पत्नीचे पेन्शन, दुसरे, मुले आणि तिसरे, त्याचे पालक.