Join us

५० हजार पगारात २.५ कोटी रुपयांचा निधी; म्युच्युअल फंडात SIP नाही PF मधूनही आहे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 10:48 IST

EPFO : कोट्यवधी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी धोका पत्करुन म्युच्युअल फंडात एसआयपी करण्याची गरज नाही. तुम्ही सरकारी योजनेतूनही हे साध्य करू शकता.

EPFO : सध्या कोटींमध्ये फंड तयार करायचा असेल तर लगेच म्युच्युअल फंडात एसआयपी करण्याचा सल्ला दिला जातो. पण, ही गुतंवणूक जोखमीच्या अधीन असते. गेल्या दोन महिन्यांचा विचार केला तर शेअर बाजार प्रचंड अस्थिर आहे. अशात जर तुम्हाला खात्रीशीर परतावा हवा असेल तर तुमच्यासाठी चांगली सरकारी योजना आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही एक लोकप्रिय बचत योजना आहे. ज्याचा उद्देश नोकरदार कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे.

या योजनेअंतर्गत, कर्मचारी आणि मालक दोघेही कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या १२-१२% EPF खात्यात योगदान देतात. या योजनेत सरकार दरवर्षी व्याजदर ठरवते. यातील सर्व उत्पन्न करमुक्त असते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून निवृत्तीच्या वेळी, कर्मचाऱ्याला पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम एकरकमी मिळते. यात व्याजाचाही समावेश असतो.

५० हजार रुपयांच्या पगारावर अडीच कोटी रुपयांचा निधी कसा तयार होणार?जर तुम्हाला पीएफ खात्यात २.५ कोटी रुपयांचा निधी जमा करायचा असेल तर त्यासाठी तुमचा पगार (पगार + बेसिक) ५० हजार रुपये असणे आवश्यक आहे. तसेच, तुम्हाला किमान ३० वर्षे काम करावे लागेल. यासाठी तुम्हाला पीएफ फंडावर किमान ८.१ टक्के व्याज मिळायला हवे. याशिवाय तुमचा पगारही वार्षिक ५ टक्के दराने वाढला पाहिजे. जर तुम्ही या सर्व गोष्टी पूर्ण केल्या तर निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे २.५ कोटी रुपयांचा फंड तयार होईल.

EPFO सदस्य होण्यासाठी पात्रता काय आहे?EPFO सदस्य होण्यासाठी तुम्हाला संघटित क्षेत्रात काम करावे लागेल. २० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपनीत तुम्ही काम करत असाल तर तुम्ही EPFO मध्ये खाते उघडू शकता. ईपीएफओचे सदस्य असल्यास बचत, विमा संरक्षण, पेन्शन आणि करमुक्त व्याज मिळते. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीतही तुम्ही या फंडातून पैसे काढू शकता.

EPFO खात्यात कर सूटजर तुमचे ईपीएफओ खाते असेल आणि त्यात दर महिन्याला पीएफ जमा होत असेल, तर कर वाचवण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. नवीन कर प्रणालीमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. यासाठी तुम्हाला जुन्या कर प्रणालीची निवड करावी लागेल. तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडल्यास, तुम्ही कलम ८०C अंतर्गत तुमच्या पगारावर १२ टक्क्यांपर्यंत कर वाचवू शकता.

EPFO मध्ये मोफत विमा सुविधाज्या कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते आहे, त्यांनाही डीफॉल्टनुसार विमा मिळतो. एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) अंतर्गत, कर्मचाऱ्याचा ६ लाख रुपयांपर्यंत विमा उतरवला जातो. सक्रिय EPFO ​​सदस्याचा त्याच्या सेवेच्या कालावधीत मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला ६ लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते. कंपन्या आणि केंद्र सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना हा लाभ देतात.

टॅग्स :गुंतवणूककर्मचारीकामगार