Join us

PF खात्यात तुमचेही पैसे जमा होत असतील तर..., EPFO कडून खातेधारकांना मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:36 IST

EPFO ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवरून ही माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही सरकारी किंवा खासगी क्षेत्रात नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारातील ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा होत असेल. तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने  (EPFO) कोट्यवधी खातेधारकांना सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी एक इशारा दिला आहे. EPFO ने खातेदार असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यासंदर्भातील माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करु नये, असा सल्ला दिला आहे. 

EPFO ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवरून ही माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, EPFO कडून खातेदारांची कोणतीही माहिती मागितली जात नाही. कोणताही व्यक्ती EPFO चा कर्मचारी अथवा अधिकारी असल्याचे सांगत फोन नंबर, ईमेल, मेसेज किंवा व्हाटसअपद्वारे यूएएन, पासवर्ड,पॅन नंबर, आधार क्रमांक, बँक खाते किंवा ओटीपी मागत असेल तर ती माहिती देऊ नका, असे सांगण्यात आले आहे. 

सायबर फ्रॉडपासून होऊ शकते मोठे नुकसानसायबर गुन्हेगार स्वत:ला EPFO चे अधिकारी असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करु शकतात. हे गुन्हेगार गोपनीय माहितीचा दुरुपयोग देखील करु शकतात. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पीएफ खात्यातील रक्कम देखील काढू शकतात, त्यामुळे खातेदारांनी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन EPFO कडून करण्यात आले आहे.

तक्रार दाखल करण्याचा सल्लाजर कोणताही व्यक्ती EPFO च्या नावाने तुमच्याकडून गोपनीय माहिती मागत असेल सतर्क व्हा आणि तक्रार दाखल करा. तसेच, सायबर कॅफे किंवा सार्वजनिक डिव्हाईसवर आपले EPFO  खाते लॉगिन करु नये, असा सल्ला देखील EPFO कडून देण्यात आला आहे.  

वैयक्तिक डिव्हाइसचा वापर कराEPFO ने खातेदारांना वैयक्तिक लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅबलेट किंवा मोबाइल फोनचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहू शकते. फसवणूक होण्याची शक्यता देखील कमी होते.  

खबरदारी घेण्याचे आवाहनEPFO कडून आपल्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडियाद्वारे देखील खातेदारांना जागरुक केले जात आहे. सायबर गुन्हेगारांपासून खातेदारांची फसवणूक होऊ नये, यासासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन EPFO कडून करण्यात येत आहे.  

जागरूक असणे आवश्यक!EPFO चा हा इशारा एक महत्त्वाचा आहे, कारण सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. खातेधारकांनी त्यांच्या खात्यांची गोपनीयता राखणे आणि अज्ञात व्यक्तींपासून सावध राहणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीसोबत किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत तुमच्या खात्याचे महत्त्वाचे तपशील शेअर करणे टाळले पाहिजे. त्यामुळे फसवणूक टाळता येऊ शकते. तसेच, खातेधारकांनी त्यांचे हक्क आणि सुरक्षा उपायांबद्दल जागरूक असले पाहिजे.

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीव्यवसाय