EPFO News Update : तुम्ही जर ईपीएफओचे सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) युनिव्हर्सल अकाउंट अॅक्टिव्हेशनला (UAN) एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमशी (ELI स्कीम) जोडण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. जी पूर्वी ३० नोव्हेंबर २०२४ होती. युनिव्हर्सल अकाउंट अॅक्टिव्हेशनची तारीख वाढवण्यासोबतच, EPFO ने बँक खात्याचे आधार लिंक करण्याची तारीखही १५ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. ईपीएफओने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
ईपीएफओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर याबाबत माहिती दिली आहे. युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय करण्याची तारीख आणि बँक खात्याचे आधार सीडिंग १५ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आले आहे. ईपीएफओने लिहिले आहे की, रोजगार लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमचा लाभ घेण्यासाठी, नव्याने सहभागी झालेले कर्मचारी आणि जे चालू आर्थिक वर्षात सामील झाले आहेत, त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सल खाते क्रमांकासह त्यांच्या बँक खात्याचे आधार सीडिंग पूर्ण करणे आवश्यक आहे.
अलीकडेच सामील झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी UAN सक्रियतेची तारीख वाढवणे अपेक्षित होते. कारण सरकारने अद्याप रोजगार लिंक्ड प्रोत्साहन योजनेचे तपशील जाहीर केलेले नाहीत. आपल्या पोस्टमध्ये, ईपीएफओने एम्पलॉयर्सना हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमचा लाभ घेण्यासाठी शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळता येईल.
एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम म्हणजे काय? रोजगाराला चालना देण्यासाठी, सरकारने एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आणली आहे. ज्यामध्ये नियोक्ता आणि कर्मचारी दोघांनाही इन्सेंटिव्ह दिले जाते. या योजनेचे उद्दिष्ट दोन वर्षांत २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रोजगार लिंक्ड प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ४.१ कोटी तरुणांना रोजगार देण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यावर ५ वर्षांत २ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. या योजनेत लाभार्थींच्या बँक खात्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रोत्साहन दिले जाईल आणि हे बँक खाते आधारशी जोडल्यासच होईल.
एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्हमधील योजना A अंतर्गत, EPFO मध्ये नोंदणीकृत असलेल्या संघटित क्षेत्रातील प्रथम कर्मचाऱ्यांना १५,००० रुपये म्हणजेच एका महिन्याचे मूळ वेतन ३ हप्त्यांमध्ये दिले जाईल. स्कीम-बी अंतर्गत, उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवल्या जाणार आहेत. या योजनेत कर्मचारी आणि मालक दोघांनाही प्रोत्साहन दिले जाईल. यामध्ये प्रथम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देण्यासाठी मालकांना प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.
स्कीम सी अंतर्गत, दोन वर्षांसाठी १ लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी EPFO योगदानासाठी नियोक्त्यांना दरमहा ३००० रुपये दिले जातील.