Join us

होळीआधीच बोंब; सहा कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 14:09 IST

EPFOच्या व्याज दरात घट; व्याज दर ८.६५ टक्क्यांवरुन ८.५ टक्क्यांवर

ठळक मुद्देभविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात कपातपीएफवरील व्याज दर ८.६५ टक्क्यांवरुन ८.५० टक्क्यांवरसहा कोटी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा धक्का

नवी दिल्ली: मोदी सरकारनं देशातल्या सहा कोटी कर्मचाऱ्यांना धक्का दिला आहे. एका बाजूला किमान निवृत्ती वेतन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना दुसऱ्या बाजूला सरकारनं ईपीएफओचे व्याज दर कमी केले आहेत. २०१९-२० या  आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) ८.५ टक्के व्याज मिळेल. गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफवरील व्याज दर ८.६५ टक्के इतका होता. मोदी सरकार ईपीएफमध्ये कपात करेल, अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. अखेर आज ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब झालं. याच बोर्डकडून पीएफच्या व्याजाची टक्केवारी निश्चित केली जाते. या निर्णयाला अर्थ मंत्रालयाची मंजुरी आवश्यक असते. ईपीएफओनं २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ईपीएफमधील रकमेवर ८.५ टक्के दरानं व्याज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात ईपीएफओनं ८.६५ टक्के व्याज दर जाहीर केला होता. तर २०१७-१८ मध्ये व्याजाचा दर ८.५५ टक्के इतका होता. मात्र यंदा ईपीएफओनं हा दर ८.५ टक्क्यांवर आणला आहे. २०१६-१७ मध्ये भविष्य निर्वाह निधीवर ८.६५ टक्के व्याज मिळत होतं. २०१५-१६ मध्ये ८.८० टक्के, २०१५-१४, २०१३-१४ मध्ये पीएफ दर ८.७५ टक्के इतका होता. २०१२-१३ मध्ये ईपीएफवरील व्याज दर ८.५० टक्के होता. त्यामुळे यंदा जाहीर झालेला व्याज दर पाच वर्षांतला सर्वात कमी व्याज दर आहे. 

टॅग्स :भविष्य निर्वाह निधी