EPFO Claim Settlements: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, म्हणजेच EPFO ने दावा निकाली काढण्याच्या बाबतीत ऐतिहासीक कामगिरी केली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात EPFO ने 5 कोटींहून अधिक दावे निकाली काढले आहेत. ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे.
मांडविया म्हणाले की, EPFO ने प्रथमच 5 कोटी रुपयांहून अधिक दावे निकाली काढत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये EPFO ने 2,05,932.49 कोटी रुपयांचे 5.08 कोटी दावे निकाली काढले, जे 2023-24 या आर्थिक वर्षातील 1,82,838.28 कोटी रुपयांच्या 4.45 कोटी दाव्यांपेक्षा अधिक आहे. दावा निकाली काढण्याची प्रक्रिया आणि तक्रार निवारणाच्या दिशेने EPFO ने उचललेल्या परिवर्तनात्मक सुधारणांच्या पावलांमुळे हे यश मिळू शकले आहे.
आम्ही ऑटो सेटलमेंट दाव्यांची मर्यादा आणि श्रेणी वाढवणे, सदस्यांच्या प्रोफाइलमधील बदल सुलभ करणे, भविष्य निर्वाह निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करणे आणि KYC अनुपालन प्रमाण सुधारणे, यासारखी पावले उचलली आहेत. या सुधारणांमुळे EPFO च्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. ऑटो-क्लेम यंत्रणेने अर्ज केल्यापासून तीन दिवसांत दाव्यावर प्रक्रिया करण्यास मदत केली आहे. या सुधारणांचा परिणाम आता स्पष्ट दिसत आहे.
चालू आर्थिक वर्षात ऑटो क्लेम सेटलमेंट दुप्पट होऊन 1.87 कोटी झाले आहे, तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 89.52 लाख ऑटो क्लेम्सवर प्रक्रिया केली जाऊ शकते. भविष्य निर्वाह निधी हस्तांतरण दावा सादर करण्याची प्रक्रियादेखील सुलभ करण्यात आली आहे. हस्तांतरण दावा अर्ज सुलभ केल्यानंतर आता केवळ 8 टक्के हस्तांतरण दाव्याच्या प्रकरणांना सदस्य आणि नियोक्त्याकडून मंजुरी आवश्यक आहे. असे 48 टक्के दावे नियोक्त्याच्या हस्तक्षेपाशिवाय सदस्यांद्वारे थेट सबमिट केले जात आहेत, तर 44 टक्के हस्तांतरण विनंत्या ऑटोमेटेड केल्या जात आहेत, अशी माहिती मांडविय यांनी दिली.