Join us  

Employee: कर्मचाऱ्यांची दिवाळी; मिळतोय १ कोटी पगार, अधिक वेतन घेणाऱ्यांची संख्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 11:44 AM

Employee: आयटीसी उद्योग समूहात वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४४ टक्क्यांनी वाढून २२० झाली आहे. त्यामुळे कर्मचारी अतिशय खूश आहेत.

नवी दिल्ली : आयटीसी उद्योग समूहात वर्षाला १ कोटी रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४४ टक्क्यांनी वाढून २२० झाली आहे. त्यामुळे कर्मचारी अतिशय खूश आहेत.कंपनीच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार,  २०२०-२१ मध्ये दरमहा ८.५ लाख रुपये अथवा वार्षिक १ कोटी रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या आयटीसी कर्मचाऱ्यांची संख्या २२० होती. आदल्या वर्षी ती १५३ होती. वर्षभर कार्यरत असलेले २२० कर्मचारी कंपनीत असे आहेत, ज्यांना वर्षाला १०२ लाख रुपये (१.०२ कोटी रुपये) म्हणजेच महिन्याला ८.५ लाख रुपये अथवा त्यापेक्षा अधिक मोबदला मिळाला. २०२१-२२ मध्ये आयटीसीचे अध्यक्ष संजीव पुरी यांना ५.३५ टक्के वाढीसह १२.५९ कोटी रुपयांचा मोबदला मिळाला. यात २.६४ कोटी रुपयांचे मूळ वेतन, ४९.६३ लाख रुपयांचे अनुषंगिक लाभ आणि ७.५२ कोटी रुपयांचा कामगिरी बोनस यांचा समावेश आहे. पुरी यांचे वेतन सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या सरासरीच्या तुलनेत २२४ पट आहे. २०२०-२१ मध्ये त्यांचे वेतन ११.९५ कोटी रुपये होते.सध्या अनेक कर्मचारी कंपन्या सोडण्याच्या तयारीत आहेत.  अहवालानुसार, पगारवाढ झाल्यानंतर १० पैकी किमान ४ कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून पगारवाढ झाली नसून, महागाई मात्र प्रचंड वाढली आहे. त्यामुळे पगारात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

कर्मचाऱ्यांची संख्या घटलीवित्त वर्ष २२ मध्ये आयटीसीच्या कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. कंपनीच्या अहवालात म्हटले आहे की, आयटीसीच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ३१ मार्च २०२२ रोजी २३,८२९ होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती ८.४ टक्के कमी आहे. वित्त वर्ष २२ मध्ये आयटीसीचे कार्यकारी संचालक बी. सुमंत आणि आर. टंडन यांना प्रत्येकी ५.७६ कोटी रुपयांचे वेतन मिळाले तसेच एन. आनंद यांना ५.६० कोटींचे वेतन मिळाले आहे.

टॅग्स :कर्मचारीपैसा