elon musk warns : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क हा फक्त एक उद्योगपती नाही. तर जगाच्या एक पाऊल पुढे राहणारा अवलीया आहे. त्यांची आतापर्यंतची सर्व उत्पादने पाहिली तर याची प्रचिती येते. यामध्ये इलेक्ट्रिक कार टेस्ला असो की वेगवान सॅटेलाईट इंटरनेट सेवा देणारी स्टारलिंक कंपनी असेल. मस्क यांची इनोवेशन सर्वांना अचंबित करणारी आहेत. अंतराळ सहल ही संकल्पना जेव्हा त्यांनी जगासमोर मांडली, तेव्हा हे शक्य नाही, म्हणून अनेकांनी वेड्यात काढलं. पण, या बहाद्दराने ही कल्पना अस्तित्वात आणून टीकाकारांच्या थोबाडीत मारली. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे इलॉन मस्क यांनी नुकतीच केलेली भविष्यवाणी. व्हाइट हाउसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या एका पत्रकार परिषदेत मस्क यांनी अमेरिका दिवाळखोर होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये मस्क यांना मानाचं पानगेल्या वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अब्जाधीश इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा जाहीर प्रचार केला. फक्त प्रचारच नाही. तर ट्रम्प यांच्या प्रचारासाठी पाण्यासारखा पैसा ओतला. निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी लागलीच मस्क यांना याचं बक्षिस दिलं. इलॉन मस्क यांना एका विभागाचं मंत्रीपद देण्यात आलं आहे. दरम्यान, 'सरकारी खर्चाला वेळीच कात्री लावली नाही, तर येत्या दिवसात अमेरिका 'दिवाळखोर' होऊ शकते', असा इशारा उद्योगपती इलॉन मस्क यांनी दिला आहे. मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्यासोबत पत्रकार परिषदेत मस्क म्हणाले की, सरकारी खर्चात कपात करणे हा पर्याय नाही तर गरज आहे.
सरकारी खर्च कमी करण्याची जबाबदारी मस्क यांच्या खांद्यावरखर्च कमी करण्यासाठी ट्रम्प सरकारने “डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी (DOGE)” नावाचा नवीन विभाग तयार केला आहे. या खात्याची जबाबदारी इलॉन मस्क यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यावेळी इलॉन मस्क यांनी फेडरल नोकरशाहीवर टीका केली. हे नोकरशहा म्हणजे निवडून न आलेले आणि असंवैधानिक सरकारची शाखा आहे. जे निवडून आलेल्या प्रतिनिधींपेक्षा अधिक शक्तिशाली झाले आहेत.
ट्रम्प यांनी सरकारी खर्चात सुधारणा करण्यासाठी कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे. सर्व फेडरल एजन्सींना DOGE अर्थात इलॉन मस्क यांच्यासूचनांचे पालन करावे लागेल. या आदेशानुसार, आता चार कर्मचारी सोडल्यास फेडरल एजन्सी फक्त एकच नवीन भरती करू शकतील. कोणत्याही नवीन नियुक्तीपूर्वी, एजन्सी प्रमुखांना मस्कच्या खात्याकडून परवानगी घ्यावी लागेल.
अर्थसंकल्पीय तूट १.८ ट्रिलियन डॉलरवरमस्क म्हणाले की अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट १.८ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रीय कर्जावरील वाढत्या व्याजाच्या हप्त्यांमुळे संकट अधिक गडद होऊ शकते. मस्क यांच्या या मताशी ट्रम्प यांनीही सहमती दर्शवली. भ्रष्टाचार संपवण्यासाठी सरकार हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. यात आमचे कुठलेही हितसंबंध जोपासले जात नसल्याचे मस्क यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की सरकारी कामकाज पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.