Join us
Daily Top 2Weekly Top 5

Isro ची नोकरी सोडून सुरू केला मस्क यांच्यासारखा व्यवसाय; आज चालवताहेत १ अब्ज डॉलर्सची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:27 IST

Success Story Hyderabad Startup: कंपनीनं २०२२ मध्ये आपल्या सब-ऑर्बिटल रॉकेटचे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी प्रक्षेपण केलं होतं, जी कामगिरी इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स देखील पहिल्या प्रयत्नात करू शकली नव्हती. या कंपनीची स्थापना १२ जून २०१८ करण्यात आली.

Success Story Hyderabad Startup: हैदराबादमधील स्पेस स्टार्टअप कंपनी स्कायरूट एरोस्पेस सध्या आपल्या 'विक्रम-१' रॉकेटच्या प्रक्षेपणाची तयारी करत आहे. हे भारताचं पहिलं खाजगी ऑर्बिटल रॉकेट असून रॉकेट लॉन्चिंग क्षेत्रात आपली जागा निर्माण करण्यासोबतच अंतराळ प्रवास स्वस्त करण्याचं कंपनीचं ध्येय आहे. स्कायरूटनं २०२२ मध्ये आपल्या 'विक्रम-एस' या सब-ऑर्बिटल रॉकेटचे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी प्रक्षेपण केलं होतं, जी कामगिरी इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स देखील पहिल्या प्रयत्नात करू शकली नव्हती. या कंपनीची स्थापना १२ जून २०१८ रोजी पवन कुमार चंदना आणि नाग भरत डाका यांनी केली होती.

गणित विषयात कच्चे ते आयआयटी पदवीधर

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमचे रहिवासी असलेले पवन चंदना लहानपणी गणितात कच्चे होते आणि एकदा त्यांना १०० पैकी केवळ ५१ गुण मिळाले होते. मात्र त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि २००७ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात आयआयटी (IIT) परीक्षा उत्तीर्ण करून खडगपूरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. अंतराळ क्षेत्राची आवड असल्याने २०१२ मध्ये ते इस्रोमध्ये (ISRO) रुजू झाले. कामाच्या प्रेमापोटी ते तिथूनच निवृत्त होण्याचा विचार करत होते, परंतु जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावणारी अंतराळ तंत्रज्ञान कंपनी स्थापन करण्याचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.

रशियानं भारतासाठी उघडली कच्च्या तेलाची टाकी; पण प्रत्येक बॅरलवर वसूल केला जातोय प्रीमिअम चार्ज

इस्रोची नोकरी सोडली आणि...

हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी २०१८ मध्ये इस्रोची नोकरी सोडली आणि नाग भरत डाका यांच्यासोबत स्कायरूटची स्थापना केली. सुरुवातीला निधी उभारण्याचं मोठं आव्हान असताना त्यांना मुकेश बन्सल यांची साथ मिळाली, ज्यांनी कंपनीत १.५ मिलियन डॉलरची गुंतवणूक केली. कोरोनामुळे गुंतवणूकदार साशंक झाले असताना रिन्यूएबल एनर्जी कंपनी 'ग्रीनको'नं स्कायरूटला पाठबळ दिलं. या काळात कंपनीनं ऑगस्ट २०२० मध्ये लिक्विड प्रपल्शन इंजिन, सप्टेंबर २०२० मध्ये देशातील पहिलं ३डी-प्रिंटेड क्रायो इंजिन आणि डिसेंबर २०२० मध्ये सॉलिड रॉकेट स्टेजची यशस्वी चाचणी केली. २०२१ मध्ये सरकारनं अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं करताच स्कायरूटनं इस्रोसोबत सामंजस्य करार केला आणि ५१ मिलियन डॉलरचा निधी उभारला.

यशस्वी प्रक्षेपण आणि भविष्यातील 'विक्रम' मालिका

१८ नोव्हेंबर २०२२ रोजी स्कायरूट एरोस्पेस ही यशस्वी रॉकेट प्रक्षेपण करणारी देशातील पहिली खाजगी कंपनी ठरली. त्यांचं 'विक्रम-एस' रॉकेट ९० किमी उंचीपर्यंत पोहोचलं, ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीच्या नवीन सुविधेचं उद्घाटन केले. सध्या या कंपनीत सुमारे १,००० कर्मचारी कार्यरत असून तिचं रॉकेट उत्पादन युनिट ही भारतातील सर्वात मोठी खाजगी युनिट आहे. कंपनी सध्या विक्रम रॉकेटच्या विविध आवृत्त्या विकसित करत असून विक्रम-१ सुमारे ४८० किलो, विक्रम-२ ५९५ किलो आणि विक्रम-३ ८१५ किलो वजन वाहून नेण्यास सक्षम आहेत. आज कंपनीचे मूल्य ५२७ मिलियन डॉलर्स असून या रॉकेटच्या यशानंतर ती जगातील अव्वल ५ खाजगी अंतराळ कंपन्यांमध्ये सामील होईल.

एलन मस्क यांचा आदर्श

पवन चंदना हे स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांना आपला आदर्श मानतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. स्पेसएक्स ही रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित करणारी जगातील पहिली खाजगी कंपनी होती आणि आता ती जगातील सर्वात मोठ्या आयपीओच्या तयारीत आहे. चंदना देखील भविष्यात स्कायरूटची शेअर बाजारात नोंदणी करू शकतात. कंपनी आता विस्तारासाठी १५० ते २०० मिलियन डॉलर उभारण्याच्या तयारीत असून यामुळे कंपनीचं मूल्य १ अब्ज डॉलरच्या जवळ पोहोचू शकते. सध्या कंपनीत संस्थापकांचा २६ टक्के वाटा असून जीआयसी, टेमासेक, डिजी टेली, मुकेश बन्सल आणि सोलर इंडस्ट्रीज यांसारख्या कंपन्यांची यात गुंतवणूक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-ISRO Scientist Starts Musk-like Venture, Now Runs Billion-Dollar Company

Web Summary : Pawan Chandana left ISRO to found Skyroot Aerospace, aiming for affordable space travel. Skyroot's successful 'Vikram-S' launch rivaled SpaceX. Valued at $527 million, Skyroot plans expansion, inspired by Elon Musk, potentially reaching a $1 billion valuation.
टॅग्स :इस्रोएलन रीव्ह मस्क