Join us  

इलॉन मस्क यांचे दोन दिवसांत २२ अब्ज डॉलर्सचे नुकसान! अंबानी-अदानींनाही झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 12:51 PM

आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी जगभरातील शेअर बाजार घसरले. यामुळे जगातील टॉप ५० श्रीमंतांपैकी ४७ लोकांच्या संपत्तीत घसरण झाली.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या निव्वळ संपत्तीतील घसरण आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी शुक्रवारीही कायम राहिली. गुरुवारी, त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये १६.१ अब्ज डॉलरची मोठी घट झाली, तर शुक्रवारी त्याला ५.८१ अब्ज  डॉलरचे नुकसान झाले. दोन दिवसांत त्यांची एकूण संपत्ती सुमारे २२ अब्ज डॉलर्सनी घसरली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मस्क यांची एकूण संपत्ती आता २०४ अब्ज डॉलर आहे. टेस्ला शेअर्सच्या घसरणीमुळे मस्क यांची एकूण संपत्ती घसरली आहे. या कंपनीचे शेअर्स दोन दिवसांत सुमारे १३ टक्क्यांनी घसरले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या निव्वळ नफ्यात ४४ टक्क्यांनी घट झाली आहे. निकाल जाहीर झाल्यापासून त्याचे शेअर्स घसरत आहेत.

कर्मचाऱ्यांना फ्लॅट-मर्सिडीज भेट देणारे सावजी ढोलकिया यावर्षी दिवाळीत काय गिफ्ट देणार?

शुक्रवारी जगातील सर्व टॉप १० श्रीमंत लोकांच्या संपत्तीत घट झाली. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती फ्रान्सचे बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या संपत्तीत २.०७ अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती आता १५३ अब्ज डॉलर्स आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी ३.३० अब्ज डॉलर गमावले आणि आता त्यांच्या खात्यात १४९ अब्ज डॉलर शिल्लक आहेत. यासोबतच बिल गेट्स, लॅरी पेज, लॅरी एलिसन, सर्जी ब्रिन, स्टीव्ह बाल्मर, वॉरेन बफे आणि मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. लॅरी एलिसन यांना सर्वाधिक, ६.०१ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.

दरम्यान, भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत असलेले मुकेश अंबानी यांच्या निव्वळ संपत्तीतही शुक्रवारी घट झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अंबानींची एकूण संपत्ती ११.९ कोटी डॉलरने घसरली आणि ८५.८ बिलियन डॉलर झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ११ व्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती १.२९ अब्ज डॉलरने घसरली आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची एकूण संपत्ती २१.१ कोटी  डॉलरने घसरून ६१ अब्ज डॉलर झाली आहे. या वर्षी त्याच्या एकूण संपत्तीत विक्रमी ५९.५ अब्ज डॉलरची घट झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तो २० व्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कशेअर बाजारव्यवसाय