Join us  

अखेर इलॉन मस्क बनले Twitter चे मालक, ४४ अब्ज डॉलरला कंपनी विकत घेतली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 6:16 AM

इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी ४३ अब्ज डॉलर (सुमारे ३२७३.४४ अब्ज रुपये) देण्याची ऑफर दिली होती. यावरून बराच वाद झाला होता.

न्यू यॉर्क : गेल्या काही दिवसांपासून टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यावरून चर्चा वाढल्या होत्या. अखेर ट्विटरनं इलॉन मस्क यांच्या प्रस्तावावर पुनर्विचार केल्यानं आता ४४ अब्ज डॉलर(सुमारे ३३६८ अब्ज रुपये) किंमतीला मस्क यांनी ट्विटर खरेदी केलं आहे. ट्विटर खरेदीसाठी आवश्यक असलेला निधी सुरक्षित करत असल्याचे मस्क यांनी नुकतेच सांगितले होते. ट्विटरनं हा व्यवहार पक्का केला असून यावर्षीच ही डील पूर्ण होईल. त्यामुळे आता ट्विटर एक प्रायव्हेट कंपनी असेल ज्याचे मालक इलॉन मस्क असतील.  

इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी ४३ अब्ज डॉलर (सुमारे ३२७३.४४ अब्ज रुपये) देण्याची ऑफर दिली होती. यावरून बराच वाद झाला होता. मात्र, एका अहवालानुसार, ट्विटर मस्क यांच्यासोबत हा करार करण्याची तयारी करत होते. मस्क यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर कंपनी आणखी चांगल्या ऑफरचा शोध घेत होती. परंतु मस्क यांना ट्विटर मिळवण्यात यश मिळालं आहे. फ्री स्पीचसाठी ट्विटरचं खासगीकरण होणं गरजेचे आहे असं मस्क यांचं म्हणणं होतं. त्यासाठी ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला.

Twitter मध्ये ९ टक्के भागीदारी खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी मस्क यांनी म्हटलं होतं की, फ्री स्पीचसाठी ट्विटरचं खासगीकरण झाले पाहिजे. परंतु इतक्या भागीदारीमुळे त्यांना खास बदल करणं शक्य नव्हतं. त्यासाठीच ट्विटर खरेदी करण्याची ऑफर त्यांनी कंपनीला दिली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच Elon Musk यांच्याकडे ट्विटरची ९ टक्के भागीदारी होती परंतु आता Elon Musk यांच्याकडे ट्विटरचे १०० टक्के हिस्सा आहे. त्यांनी ५४.५० डॉलर्स प्रति शेअर या दराने कंपनी खरेदी केली आहे.

ट्विटर खरेदी केल्यानंतर Elon Musk यांचं पहिलं ट्विट

भलेही ट्विटरसोबत व्यवहार होण्यास आणखी काही वेळ लागेल. परंतु आता इलॉन मस्क यांना ट्विटरचे मालक म्हणू शकतो. म्हणजे ट्विटरचे मालक झाल्यानंतर मस्क यांनी पहिलं ट्विट केले त्यात त्यांच्या विधानाचं स्क्रिन शॉट शेअर केले आहे. ज्यात मस्क यांनी ट्विटरवर फ्री स्पीच होण्याची मागणी केली होती.

इलॉन मस्क यांनी म्हटलं होतं की, "लोकशाहीसाठी फ्रीडम ऑफ स्पीच अतिशय महत्वाचं आहे. पण ट्विटर या तत्त्वाचं काटेकोरपणं पालन करतं का?", असा प्रश्न युझर्सना विचारला होता. मस्क यांनी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा विचार केला होता. जिथं यूझर्स त्यांना हवं ते लिहू शकतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे सोशल प्लॅटफॉर्म- सोशल ट्रुथ लॉन्च करण्यामागील कारण देखील तेच आहे. हे गेल्या महिन्यात iOS वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात आले होतं. हे सध्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध करून देण्यात आलं आहे. ट्विटर, फेसबुक आणि इतर अनेक सोशल एप्सनं बंदी घातल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटर