कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) नोकरदारांना मोठा दिलासा दिलाय. खरं तर ईपीएफओनं युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) अॅक्टिव्हेट करण्यासाठी आणि बँक खातं आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे आणि आता हे आवश्यक काम पुढील महिन्यात १५ मार्च २०२५ पर्यंत केलं जाऊ शकते. यूएएन अॅक्टिव्हेट करण्याचे अनेक फायदे असून हे काम करून ईपीएफओच्या सर्व ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येऊ शकतो.
ईपीएफओच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर मंगळवारी एका पोस्टद्वारे यासंदर्भातील माहिती शेअर करण्यात आली. यूएएन अॅक्टिव्हेशन आणि आधार सीडिंगची अखेरची तारीख १५ फेब्रुवारी रोजी संपली होती, परंतु ती पुन्हा एकदा १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. 'महत्त्वाची सूचना- ईपीएफओनं यूएएन अॅक्टिव्हेशन आणि बँक आधाक सीडिंगला १५ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ईपीएफओच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर यूएएन अॅक्टिव्हेट करा,' असं यात नमूद करण्यात आलंय.
यूएएन अॅक्टिव्हेट करणं का आवश्यक?
युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच यूएएन हा १२ अंकी असून या माध्यमातून कर्मचारी आपल्या पीएफ खात्याशी संबंधित प्रत्येक माहितीचा मागोवा घेऊ शकतात. हा अकाऊंट नंबर अॅक्टिव्हेट करणं आवश्यक आहे, कारण कर्मचारी ईपीएफओ ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये पीएफ खात्याची माहिती देण्यापासून ते पासबुक डाऊनलोड करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय पीएफ खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी किंवा पीएफ ट्रान्सफरसाठीही ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
यूएएन अॅक्टिव्हेट कसं कराल?
- ईपीएफओच्या epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- आता स्क्रिनवरील सर्व्हिेसेस सेक्शनमध्ये For Employees वर क्लिक करा.
- नव्या पेजवर इम्पॉर्टंट लिंकमध्ये दिसत असलेल्या Activate UAN वर क्लिक करा.
- आता १२ अंकांचा UAN, आधार नंबर, नाव, जन्म तारीख, मोबाइल नंबर आणि कॅप्चा भरा.
- डिक्लेरेशन फॉर्मवर क्लिक करून Get Authorization Pin वर क्लिक करा.
- आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका आणि सबमिट करा.
- यानंतर तुमचा यूएएन अॅक्टिव्हेट होईल आणि तुमच्या मोबाइलवर एक पासवर्ड येईल.
- यूएएन आणि पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉग इन करा.