मुंबई : अंमलबजावणी महासंचालनालयाने (ईडी) सोमवारी इंडिया बुल्स फायनान्स सेंटरच्या मुंबईतील मालमत्तांवर छापेमारी केली. काळ्या पैशांविरोधातील कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली आहे.
इंडिया बुल्स फायनान्स सेंटरचे प्रवर्तक समीर गेहलोत यांच्यासह संबंधित कंपन्या व व्यक्तींवर एप्रिल महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला. याप्रकरणात ईडीने यापूर्वी पुण्यातील रिअल इस्टेट फर्मच्या प्रवर्तकांपैकी एकाकडे चौकशी करून जबाब नोंदवला होता. ईडीने सोमवारी मुंबईत वेगवेगळी पथके स्थापन करत ही छापेमारी केली. यात काही महत्त्वाची कागदपत्रेही हाती लागली आहेत.
याच प्रकरणी पालघरमध्येही कंपनी व प्रवर्तकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यात कंपनीने पैसे काढत वाढीव किंमती दाखविण्यासाठी स्वत:च्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. यात काही रिअल इस्टेट कंपन्यांचा उल्लेख केला आहे. ज्या कंपन्यांनी इंडिया बुल्सकडून कर्ज घेतले होते, ते पैसे इंडिया बुल्स हाऊसिंग शेअर्समध्ये परत केले होते. २०१० ते २०१४ या काळात कंपनीकडून निधी पळवण्यात आल्याचा उल्लेखही यामध्ये करण्यात आला होता.
कोर्टाची मनाई?ईडीची छापेमारी सुरू असतानाच, दिल्ली न्यायालयाने कंपनीविरोधात कठोर कारवाई करू नये, असा आदेश दिला असल्याचा दावा इंडिया बुल्स कंपनीकडून करण्यात येत आहे.