Join us

हॉलंडचा कांदा महाराष्ट्रापेक्षा चवदार आहे का? राज्यातील कांदा उत्पादनबद्दल 'डिटेल्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 19:15 IST

एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी सहा टक्के जमिनीवर ‘हॉलंड अनियन’चे पीक घेतले जाते. गेल्या १५ वर्षांत यात ५० टक्के वाढ होऊन आता कांदा उत्पादनाचे क्षेत्र ३० हजार हेक्टरवर पोहोचले आहे

महाराष्ट्राच्या तीन लाख सात हजार ७१३ चौ. किमी क्षेत्रफळाच्या तुलनेत केवळ ४१,५२८ चौ. किमी क्षेत्रफळ असलेला नेदरलॅण्ड (हॉलंड) हा छोटासा देश जगातील प्रमुख कांदा उत्पादक देश आहे. कांदा उत्पादनाच्या दृष्टीने नेदरलँडचा जगात १२ वा क्रमांक लागत असला तरी कांद्याच्या जागतिक निर्यातीमध्ये हॉलंडच्या कांद्याचा वाटा १५ टक्के आहे. म्हणजेच निर्याताभिमुख कांदा उत्पादनात नेदरलँड अव्वल स्थानी आहे. हा कांदा ‘हॉलंड ओनियन’ या नावाने ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आहे. नेदरलँडमध्ये वर्षाला १.३ दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन होते व त्यापैकी एक दशलक्ष टन म्हणजे जवळपास ९० टक्के कांदा १३० देशांना निर्यात केला जातो.

एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी सहा टक्के जमिनीवर ‘हॉलंड अनियन’चे पीक घेतले जाते. गेल्या १५ वर्षांत यात ५० टक्के वाढ होऊन आता कांदा उत्पादनाचे क्षेत्र ३० हजार हेक्टरवर पोहोचले आहे. नेदरलँडमधील नैऋत्येकडील सुपिक चिकणमातीच्या खोऱ्यांचे प्रदेश व दक्षिण हॉलंडमधील झीलँड प्रांत येथे प्रामुख्याने कांदा पिकविला जातो. 

उत्तम स्वादाचे रहस्यn ‘हॉलंड ओनियन’ लाल व पिवळा अशा दोन रंगात मिळतो. n एकाच आकाराचे गोलाकर, पातळ सालीचे व घट्ट पाकळ्यांचे कंद हे या कांद्याचे वैशिष्ट्य मानले जाते.n हा कांदा कुरकुरीत असतो व त्याला उत्तम स्वाद असतो. n ज्या जमिनीत तो पिकविला जातो त्यातील अनेक पौष्टिक खनिज घटकही या कांद्यात उतरतात. n ‘हॉलंड ओनियन’ची सर्वात मोठी खासियत म्हणजे एका मोसमात पिकविलेला कांदा दुसऱ्या मोसमापर्यंतही न सडता जसाच्या तसा राहतो.

कांदा उत्पादकांची संघटनाहॉलंड ओनियन असोसिएशन ही नेदरलँडमधील कांदा उत्पादकांची संघटना आहे. शेतकऱ्यांच्या कित्येक पिढ्या कांदा पिकविणाऱ्या आहेत. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला सरकारी व खासगी पातळीवरील अनेक संशोधन संस्थांकडून वैज्ञानिक शेतीविषयक ज्ञानाची जोड दिली जाते. शेतकऱ्यांना उत्तमोत्तम बियाणे व खते संघटितपणे पुरविले जातात. पिकांना बाधा पोहोचवू शकणाऱ्या संभाव्य किडी-रोगांचा सामूहिकपणे बंदोबस्त केला जातो. योग्यवेळी लागवड व योग्य वेळी पिकाची काढणी हे येथील उत्तम पिकाचे गमक आहे.

देशाच्या संपन्नतेत कांद्याचे  योगदानn बहुतांश कांदा निर्यातीसाठी पिकविला जात असल्याने कठोर आंतरराष्ट्रीय मापदंड लावून उच्च पातळीवर दर्जा नियंत्रण केले जाते. n युरोपमधील तीन सर्वात मोठी सागरी बंदरे रस्त्याने काही तासांच्या अंतरावर आहेत. n शेतापासून गोदामे व वाहतुकीतही कांदा कायम एकाच ठराविक तापमानात राहील अशी सोय असते.n मागणीनुसार अल्पावधीत कांदा निर्यातीसाठी सज्ज केला जातो. n मागणी येताच आठवड्यात ३५ हजार टन कांदा निर्यातयोग्य स्वरूपात तयार करण्याची तेथे व्यवस्था आहे. n शेतापासून ते ग्राहकापर्यंत प्रत्येक टप्प्याला कांद्याच्या दर्जा नियंत्रणाची काळजी घेतली जात असल्याने विकलेला माल खराब निघाल्याच्या तक्रारी येत नाहीत. n सर्वांनी पूर्ण समन्वय ठेवून आणि पक्के ध्येय डोळ्यापुढे ठेवून मनापासून काम केले तर शेतीमालाची निर्यातही देशाच्या संपन्नतेस कसा हातभार लावू शकते, याचे नेदरलँड हे उत्तम उदाहरण आहे. 

एक माणूस वर्षभरात किती किलो कांदा खातो?जगात कांदा ही सर्वाधिक खाल्ली जाणारी भाजी आहे. जगातील लोक सरासरी वर्षाला दरडोई ९ किलो कांदा खातात. लीबियामध्ये मात्र कांदा खाण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे वर्षाला दरडोई सरासरी ३० किलो एवढे आहे. जगभरात सध्या ७० दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन होते. सन २०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ९ अब्जावर जाईल व कांद्याची मागणी आणखी सात लाख टनांनी वाढेल, अशी अपेक्षा आहे.

युरोपातील मुक्त व्यापार धोरणानुसार नेदरलँडमध्ये आमच्या सरकारचा शेतमाल विक्रीवर कोणताही अंकूश नाही. कांद्याच्या विक्रीवर कोणतीही बंधने नसल्याने शेतकरी हवा तेव्हा परदेशात कांदा पाठवू शकतो. हॉलंड ओनिअन असोसिएशनकडून कांद्याचे उत्पादन, विक्री व निर्यात यासाठी वेळोवेळी मदत केली जाते.     - गिसब्रेट गुंटर, अध्यक्ष, हॉलंड ओनियन असोसिएशन 

टॅग्स :कांदाव्यवसायआंतरराष्ट्रीय