Join us

योगींमुळे चित्रांनी बाजाराला केले ‘खासगी क्लब’; एनएसई घोटाळ्यात न्यायालयाने सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 09:02 IST

सध्याच्या या घोटाळ्यांचा देशातील गुंतवणुकीवरही परिणाम मोठ होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेल्या एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण या बाजाराला एका ‘खासगी क्लब’प्रमाणे चालवत होत्या. यामुळे बाजाराचे मोठे नुकसान झाले, असे खोडबोल न्यायालयाने सुनावत चित्रा रामकृष्ण आणि योगी बनून चित्रा यांना सल्ला देणाऱ्या आनंद सुब्रमण्यम यांना जामीन  फेटाळला. यावेळी न्यायालयाने नोबेल पुरस्कार विजेते बॉब डायलन आणि फ्रेंकस्टीन मॉन्स्टर यांचा संदर्भ दिला.

गायक, लेखक नोबेल पारितोषिक विजेते बॉब डिलन एकदा म्हणाले होते की, ‘मनी डज नॉट टॉक, इट स्वेअर्स’. हे १९६४ सालच्या ‘इट्स ऑलराईट मा आय ॲम ओन्ली ब्लीडिंग’ या गाण्याच्या अल्बममधील गाणे आहे, याचा अर्थ फक्त पैशाचा परिणाम होत नाही, तर त्याचा खूप मोठा प्रभाव असतो आणि त्याचा लोकांवर विपरीत परिणामही होतो, असे विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी आदेशात म्हटले आहे. न्यायालयाने आपल्या ४२ पानी आदेशात म्हटले आहे की, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसह आर्थिक जग एनएसईला बळकट करण्यासाठी वाट पाहत आहे. जेणेकरून ते गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात भारतात येऊ शकतील, जे सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण आहे. 

परकीय गुंतवणूकदारांना नेहमी निष्पक्ष, पारदर्शक आणि अतिशय भ्रष्टाचारमुक्त शेअर बाजार हवा आहे. मात्र सध्याच्या या घोटाळ्यांचा देशातील गुंतवणुकीवरही परिणाम मोठ होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले आहे.

न्यायालय काय म्हणाले?

एनएसईमधील कामकाजाच्या बाबतीत असे म्हणता येईल की, एखाद्या संस्थेच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा ती स्वतः अडचणीत सापडते. त्या क्षणी त्यांना एक रस्ता निवडावा लागतो, जो गोष्टी दाबून टाकण्याऐवजी त्या संस्थेचे जुने वैभव आणेल, जो नंतर फ्रेंकस्टीन मॉन्स्टर बनू शकेल. 

टॅग्स :शेअर बाजारन्यायालय