Join us  

बुडत असलेल्या एअर इंडियाला सावरण्यासाठी आराखडा तयार!, सरकारची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 6:29 AM

तोट्यात असलेल्या एअर इंडिया या सरकारी विमानसेवा कंपनीच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा तयार झाला आहे. कंपनीला सर्वसमावेश आर्थिक पॅकेज देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे,

नवी दिल्ली : तोट्यात असलेल्या एअर इंडिया या सरकारी विमानसेवा कंपनीच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा तयार झाला आहे. कंपनीला सर्वसमावेश आर्थिक पॅकेज देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे, अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा यांनी गुरूवारी लोकसभेत दिली.एअर इंडिया ही कंपनी सध्या जवळपास ५५ हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करीत आहे. सरकारने सुरुवातीला कंपनीच्या विक्रीचा प्रयत्न केला. पण त्या प्रतिसाद न मिळाल्याने अन्य मार्गांनी निधी उभारण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला. त्याअंतर्गत स्थावर मालमत्तांची विक्री व काही मालमत्तांना भाडेपट्टीवर देण्यात आले आहे. त्यानंतर आता कंपनीला वाचविण्यासाठी सरकारने पॅकेजची तयारी सुरू केली आहे.सिन्हा यांनी सांगितले की, सरकार एअर इंडियाला सर्वसमावेश आर्थिक पॅकेज देईल. त्यामध्ये कंपनीच्या प्रत्येक व्यवसायासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असेल. याखेरीज कंपनीच्या संघटनात्मक संरचनेतही आमुलाग्र बदल केले जातील. व्यवस्थापनाला बळ दिले जाईल. कंपनीच्या मालमत्तांचे विशेष उद्देश कंपनीकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यामुळे कंपनीवरील आर्थिक ताण कमी होईल.केंद्र सरकारने एअर इंडियाच्या विविध शहरांमधील स्थावर मालमत्तांच्या विक्रीतून आतापर्यंत ४१० कोटी रुपये निधी उभा केला आहे. काही मालमत्तांद्वारे वार्षिक ३१० कोटी रुपयांचे भाडे कंपनीला मिळत आहे. याखेरीज मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असलेली इमारतही विक्रीसाठी काढली असून त्याद्वारे १४०० कोटी रुपयाहून अधिक रक्कम मिळण्याची सरकारला अपेक्षा आहे.सरसंघचालकांचे आदेश?एअर इंडियाच्या विक्रीबाबतसरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत एका कार्यक्रमात केंद्र सरकारचे कान टोचले होते.एवढ्या मोठ्या सरकारी कंपनीच्या विक्रीची गरज काय? अन्य मार्गांचा विचार करा, असे निर्देशवजा आवाहन त्यांनी मुंबई शेअर बाजारातील कार्यक्रमात केले होते. त्यानंतरच सरकारने ही विक्री प्रक्रिया थांबवून आता सावरण्यासाठी तयारीकेली आहे.

टॅग्स :एअर इंडियाव्यवसाय