Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोण कोणत्या कंपनीची आहे मालक; अचानक का चर्चेत आलंय तिचं नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:35 IST

दीपिका पादुकोण अभिनयासोबतच व्यवसायातदेखील आपलं नशीब आजमावत आहे. पाहा कोणती आहे दीपिका पादुकोणची कंपनी आणि का सध्या ती चर्चेत आलीये.

Deepika Padukone Business: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्या मालकीची स्कीनकेअर ब्रँड 82°E ची मूळ कंपनी डीपीकेए युनिव्हर्सल कंझ्युमर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (DPKA Universal Consumer Ventures Pvt. Ltd.) अचानक चर्चेत आली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आपला तोटा सुमारे ४७% पर्यंत कमी केला आहे. कंपनीचा तोटा कमी होऊन १२.७ कोटी रुपये राहिला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये हा तोटा २३.४ कोटी रुपये होता. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (MCA) फाइलिंगचा हवाला देत मनीकंट्रोलनं ही माहिती दिली आहे. कंपनीनं विक्री वाढवण्याच्या प्रयत्नांअंतर्गत खर्चात कपात केली आहे. मात्र, या दरम्यान कंपनीचा महसूल देखील ३०% नं घसरून १४.७ कोटी रुपये झाला आहे.

तोटा आणि खर्चात मोठी कपात

एमसीएच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये डीपीकेए युनिव्हर्सल कंझ्युमर व्हेंचर्सचा तोटा मागील वर्षीच्या २३.४ कोटी रुपयांवरून १२.७ कोटी रुपयांवर आला आहे, जी सुमारे ४७% ची घट दर्शवते. कंपनीचा एकूण खर्च देखील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कमी होऊन २५.९ कोटी रुपये राहिला, जो मागील वर्षी ४७.१ कोटी रुपये होता. मात्र, हा खर्च अजूनही कंपनीच्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे, ज्यामुळे कंपनीला तोटा होत आहे.

अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी

विशेषतः, 82°E नं मार्केटिंग खर्चात मोठी कपात केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये हा खर्च ४.४ कोटी रुपये राहिला आहे, तर मागील वर्षी हा खर्च २० कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये केलेल्या प्रयत्नांतून अपेक्षेनुसार परिणाम न मिळाल्यानं कंपनीनं ग्राहक मिळवण्यावरचा आपला जोर कमी केल्याचे यातून दिसून येते.

महसुलात घसरण

या दरम्यान दीपिका पादुकोणच्या 82°E ब्रँडच्या महसुलातही ३०% ची घसरण झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीचा महसूल १४.७ कोटी रुपये राहिला, तर मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये तो २१.२ कोटी रुपये होता. विक्री वाढवून नफा मिळवण्याच्या प्रयत्नात कंपनी खर्चात कपात करत आहे.

स्पर्धा आणि भागिदारी

82°E ची अनेक डायरेक्ट-टू-कंझ्युमर (DTC) ब्रँड्स तसेच Estée Lauder आणि L’Occitane सारख्या प्रीमियम ब्रँड्सशी स्पर्धा आहे. डीटीसी ब्रँड्समध्ये Foxtale, mCaffeine आणि Plum यांचा समावेश आहे. कंपनी नायका (Nykaa) आणि कतरिना कैफच्या के ब्युटी (Kay Beauty) सारख्या इतर प्रतिस्पर्धकांचाही सामना करत आहे.

कंपनी आपली ब्रँड ॲम्बेसेडर दीपिका पादुकोण हिची लोकप्रियता आणि सोशल मीडियावरील चाहत्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. दीपिका पादुकोण स्वतः या उत्पादनांचा प्रचार करतेय. या उत्पादनांची किंमत २,५०० रुपये ते ४,००० रुपयांदरम्यान आहे.

कंपनीच्या डिटेल्स काय?

Tracxn वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत कंपनीचे पेड-अप कॅपिटल ८.९२ कोटी रुपये होतं. कंपनीचे संचालक प्रकाश रमेश पादुकोण आणि दीपिका प्रकाश पादुकोण आहेत. जिगर के शाह आणि दीपिका पादुकोण या कंपनीचे सह-संस्थापक आहेत.

शेअरहोल्डिंग पॅटर्न काय?

संस्थापकांकडे एकूण शेअरहोल्डिंग्सपैकी ५८.३% हिस्सा आहे. दीपिका पादुकोण फॅमिली ऑफिसचा ६.२% हिस्सांदेखील. एंजल इनव्हेस्टर्सकडे १४.६% हिस्सा असून हे कंपनीचे प्रमुख भागधारक आहेत. कंपनीनं सध्या या घडामोडीवर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Why is Deepika Padukone's company in the news suddenly?

Web Summary : Deepika Padukone's skincare brand 82°E's parent company, DPKA, reduced losses by 47% in FY25. Despite cost cuts, revenue fell 30%. The company faces competition from various DTC and premium brands. Deepika actively promotes the products priced between ₹2,500 to ₹4,000.
टॅग्स :दीपिका पादुकोणव्यवसाय