अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात कारस्थान रचण्यास सुरुवात केली आहे. भारतावर २५ टक्के टेरिफ लादण्याची धमकी देत दुसरीकडे भारताचा दुश्मन पाकिस्तानला कच्च्या तेलाचे साठे शोधण्यासाठी आणि तेल विहीरी विकसित करण्यासाठी मदत करण्याची डील केली आहे. एकप्रकारे भारताला डिवचण्याचाच हा प्रकार ट्रम्प करत आहेत. कारण एकच भारत अमेरिकेच्या ट्रेड डीलसाठी तोडपाणी करत नाहीय. एवढेच नाही तर ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत असे म्हटले आहे. एवढे करूनही ट्रम्प यांना भारताकडून त्यांच्या अटीवर डील होईल अशी आशा आहे.
ट्रम्प यांनी गुरुवारी १० ते ४१ टक्क्यांपर्यंतच्या रेसिप्रोकल टेरिफच्या आदेशावर सही केली आहे. महत्वाचे म्हणजे यात चीनचे नाव नाहीय. याचा परिणाम ७० हून अधिक देशांवर होणार असून अमेरिकेत महागाई उसळणार आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेला व्यापार असमतोल दूर करण्यासाठी आणि अमेरिकेची आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ट्रम्प यांनी सुरुवातीला टेरिफसाठी १ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली होती, सर्व देशांसोबत व्यापार करार तोपर्यंत पूर्ण करता येतील अशी अपेक्षा ट्रम्पना होती. याला चीन, जपान बधला आहे. परंतू, भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. कारण अमेरिका भारतात मांसाहारी दुधासह अन्य शेतीची उत्पादने विकू इच्छित होता. जे मोदी सरकारने मान्य केले नाही. यामुळे ट्रम्पसोबतची टेरिफ डील अडकली आहे. यामुळे ट्रम्प भारताला वाट्टेल तसे बोलण्याचा हट्ट पुरवत आहेत. अमेरिकेने इराणसोबत व्यवहार केल्याचा आरोप करत सहा भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. ट्रम्प भारताला ब्लॅकमेल करून डील करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ट्रम्प यांनी सही केल्याने ७० पेक्षा जास्त देशांवर टॅरिफ लागू होणार आहे. हे टॅरिफ आदेश जारी झाल्यानंतर ७ दिवसांनी लागू होतील. यामुळे भारताला डील करण्यासाठी आणखी सात दिवस देण्यात आले आहेत. भारतासारखे देश अमेरिकन वस्तूंवर भारी शुल्क लादतात, तर स्वतःसाठी व्यापार सवलतींची मागणी करतात, असा ट्रम्प यांचा आक्षेप आहे. अमेरिकेने भारतावरच नाही तर पाकिस्तानवर १९%, बांगलादेश आणि व्हिएतनामवर २०%, दक्षिण आफ्रिकेवर ३०% आणि स्वित्झर्लंडवर सर्वाधिक ३९% शुल्क लादले आहे. कॅमेरून, चाड, इस्रायल, तुर्की, व्हेनेझुएला आणि लेसोथो सारख्या देशांवर १५% शुल्क लादण्यात आले आहे.
लगेचच वस्तू महागणार नाहीत...
इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे अमेरिकेत लगेचच हे आयात वस्तूंवर टेरिफ लागणार नाही. कारण ज्या देशांचा माल ७ ऑगस्टपर्यंत अमेरिकेसाठी निघणार आहे, त्या मालावर हे दर लागू होणार नाहीत. कोणताही माल ७ ऑगस्टपर्यंत जहाजावर लोड केला गेला असेल आणि ५ ऑक्टोबरपर्यंत अमेरिकेत पोहोचला असेल, तर त्यावर नवीन टॅरिफ लागू होणार नाही. कारण तो आधीच वाहतुकीत असणार आहे. यामुळे ट्रम्प यांना भारतासह हे देश ५ ऑक्टोबरपर्यंत बधतील असे वाटत आहे.