काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारमधून अॅपलला भारतात आयफोन न बनविण्याचा धमकीवजा सल्ला दिला होता. अॅपलचे सीईओ टीम कुक यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतू, यानंतर काहीच दिवसांनी अॅपलने भारतात मोठी गुंतवणूक केली होती. यावरून ट्रम्प संतापले आहेत. त्यांनी रातोरात भारताबाहेर बनणाऱ्या आयफोनसह सर्व कंपन्यांच्या स्मार्टफोनवर २५ टक्के टेरिफ लादले आहे.
यामुळे अमेरिकेत आयफोन २५ टक्क्यांनी महाग होणार आहेत. तसेच ज्या कंपन्या बाहेरच्या देशातून स्मार्टफोन आयात करतात त्यांचेही फोन २५ टक्क्यांनी महागणार आहेत. येत्या १ जूनपासून हे टेरिफ वॉर सुरु केले जाणार आहे. युरोपमधून येणाऱ्या सर्वप्रकारच्या मालावर ५० टक्के आणि अमेरिकेत न बनलेल्या सर्व स्मार्टफोनवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ट्रम्प यांनी युरोपियन युनियनवर निशाणा साधला आहे. व्यापारावरील चर्चा थांबल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर त्यांनी ही घोषणा केली आहे. ही चर्चा चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. युरोपियन युनियनने अमेरिकी उत्पादनांवर युरोपमध्ये बंदी घालण्याची धमकी दिल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
तसेच अॅपलला देशांतर्गत आयफोनचे उत्पादन करावे लागेल, अन्यथा नवीन शुल्काचा सामना करावा लागेल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेतच उत्पादन व्हायला हवे असे मी टिम कुक यांना खूप आधी सांगितले होते, असेही ट्रम्प म्हणाले. कुकने मला भारतात प्रकल्प उभारत असल्याचे म्हटले, तेव्हा मी त्याला भारतात जाणे ठीक आहे, पण तुम्ही ते इथे टॅरिफशिवाय विकू शकणार नाही असे सांगितले आहे. अमेरिकेत आयफोन विकणार असतील तर मला तो अमेरिकेत बनवावा असे वाटत असल्याचे ट्रम्प म्हणाले.