डोनाल्ड ट्रम्प यांचे 'वन बिग ब्युटीफुल बिल' मंगळवारी अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर झाले. पुढील टप्प्यात हे विधेयक आता हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पाठवण्यात येणारे. याच विधेयकामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, नंतर मस्क यांनी माफी मागितली. पण या दोघांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. कर सवलती आणि खर्च कपातीशी संबंधित वन बिग ब्युटीफुल विधेयकावरून मस्क आणि ट्रम्प यांच्यातील तणाव पुन्हा वाढलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट शेअर केलीये. जर हे वेडेपणानं भरलेलं स्पेंडिंग विधेयक मंजूर झालं तर दुसऱ्या दिवशी 'अमेरिका पार्टी' स्थापन होईल. आपल्या देशाला डेमोक्रॅट-रिपब्लिकन पक्षाच्या पर्यायाची गरज आहे, जेणेकरून जनतेचा खऱ्या अर्थानं आवाज उठेल,'' असं मस्क म्हणाले.
मस्क विरोधात का?
दुसरीकडे ट्रम्प यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या सबसिडीवरून टेस्लाच्या सीईओंवर निशाणा साधला. मस्क यांनी तीन दिवसांपूर्वी या विधेयकावर टीका करताना रिपब्लिकन सिनेटर ज्या कायद्याला मंजुरी देण्यासाठी धडपडत आहेत, त्यामुळे नोकऱ्या नष्ट होतील आणि उदयोन्मुख उद्योग बंद होतील, असा युक्तिवाद केला होता. 'सरकारी खर्चात कपात करण्यासाठी प्रचार करणाऱ्या आणि त्यानंतर लगेचच इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जवाढीच्या बाजूनं मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या प्रत्येक सदस्यानं शरमेने डोकं टेकवलं पाहिजे," असंही त्यांनी 'एक्स'वर लिहिलंय.
"मस्कना सर्वाधिक सब्सिडी मिळाली"
डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर केलेली टीका इलेक्ट्रिक वाहनं आणि अनुदानांवर केंद्रित होती. मंगळवारी सकाळी 'ट्रुथ सोशल' वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की मस्क यांना माहीत आहे की ते ईव्ही मँडेटच्या विरोधात आहे आणि लोकांना ईव्ही खरेदी करण्यास भाग पाडले जाऊ नये. इतिहासात आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीपेक्षा इलॉन मस्क यांना जास्त अनुदान मिळालं आहे. सब्सिडीशिवाय इलॉन मस्क कदाचित दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेत परतले असते," असं ट्रम्प यांनी लिहिलंय.